बांगलादेशातही इंधन दरवाढीचा भडका

पन्नास टक्क्यांनी दर वाढल्याने नागरिक संतप्त, ठिकठिकाणी आंदोलन
Fuel price hike
Fuel price hike

ढाका - बांगलादेश सरकारने इंधन दरांत ५१.२ टक्क्यांनी वाढ केल्याने आज विविध शहरांमध्ये हजारो नागरिकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला. श्रीलंकेनंतर भारताच्या या दुसऱ्या शेजारी देशामध्ये इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. बांगलादेशमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात इंधर दरवाढ झाली आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जागतिक पातळीवर इंधन दरात वाढ झाली आहे. बांगलादेशमध्येही त्याचा मोठा फटका बसला असून येथील पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने थेट ५१.२ टक्क्यांनी इंधन दरवाढ केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आज नागरिकांनी आंदोलन करत अनेक इंधन पंपांना घेराव घालत दरवाढ मागे घेण्याची सरकारकडे मागणी केली. अनेक पंपांवर आज हाणामारीही झाली. गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरवाढीनंतर बांगलादेशमध्ये एक लिटर पेट्रोल आता १३० टका (१०८ रुपये) या किमतीला मिळत आहे. या दरवाढीविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक रुप धारण केले आहे. आंदोलनादरम्यान नागरिकांनी पोलिसांची वाहनेही जाळली.

महागाईबाबतही चिंता

इंधन दरवाढ केल्याने सरकारवरील अंशदानाचा भार कमी होईल, अशी बांगलादेश सरकारला आशा आहे. मात्र, त्यामुळे देशातील महागाईही प्रचंड प्रमाणात वाढणार असून त्याचा मोठा दबाव सरकारवर पडणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांत बांगलादेशची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे. मात्र, जागतिक पातळीवर अन्नधान्य आणि ऊर्जेच्या वाढत्या दरांमुळे या देशाचा आयातीवरील खर्च वाढून अर्थव्यवस्थेच्या वेगाला लगाम बसत आहे. बांगलादेशवर सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ७६ कोटी २० लाख डॉलरचे कर्ज आहे. गेल्या काही वर्षांत आयातीचे प्रमाण वाढल्याने परकी चलनाचा साठाही आटत चालला आहे. या सर्व परिस्थितीमुळे या देशाची वाटचाल श्रीलंकेप्रमाणेच होण्याची शक्यताही अर्थतज्ज्ञ वर्तवित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com