पायाचे नखही दिसता कामा नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Restrictions on Afghan women

पायाचे नखही दिसता कामा नये

काबूल - अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे हाती असलेल्या तालिबान संघटनेने देशातील महिलांना डोक्यापासून टाचांपर्यंत संपूर्ण शरीर झाकून घेतील असे कपडे परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. तालिबानच्या या आदेशामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या सरकारला मान्यता मिळण्याची शक्यता आणखी धूसर झाली आहे. तालिबानने गेल्या वर्षी १५ ऑगस्टला देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून विविध आदेशांद्वारे सामान्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली आहेत. ताज्या आदेशात महिलांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, घराबाहेर पडताना डोक्यापासून टाचांपर्यंत सर्व अंग झाकले जाईल, असेच कपडे परिधान करावे, असे बजावण्यात आले. या आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या घरातील पुरुषांना शिक्षा केली जाईल आणि जितक्यावेळा महिलांकडून नियमभंग होईल, पुरुषांना तितकीच अधिक तीव्र शिक्षा केली जाईल, असेही तालिबानने बजावले आहे. अफगाणिस्तानला अधिक कट्टरतेकडे नेण्यासाठी तालिबानने गेल्या काही महिन्यांत दिलेल्या आदेशांमध्ये या आदेशाची भर पडली आहे.

महिला आणि जनतेवरील बंधनांमुळेच तालिबानच्या सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळालेली नाही. तालिबानने अनेक देशांना पत्र पाठवून संबंध प्रस्थापित करण्याची केलेली विनंतीही दुर्लक्षित राहिली आहे. अफगाणिस्तानमधील मानवाधिकारांच्या स्थितीबाबत अनेक देश आणि मानवी हक्क संघटना चिंतेत आहेत.

काही आदेश गुंडाळले

तालिबानने अनेक आदेश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी जनतेकडून किती प्रमाणात विरोध होतो, त्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. गेल्याच महिन्यात तालिबानने आदेश काढत महिलांना एकटीने प्रवास करण्यास मनाई केली. मात्र, त्याला जोरदार विरोध होताच हा आदेश बासनात गुंडाळण्यात आला. तसेच, मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या आदेशाला विरोध झाल्यानंतर त्यांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली.

Web Title: Further Increase In Restrictions On Afghan Women Taliban Orders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenKabulrestriction
go to top