दक्षिण सुदानमधील भविष्य अंधकारमय

यूएनआय
सोमवार, 9 जुलै 2018

अनेक वर्षे विकासप्रक्रियेपासून दूर असलेला हा देश संघर्षामुळे अधिक असुरक्षित झाला असून, लाखो मुले शाळा, पोषक आहारापासून वंचित आहेत. रोगराईबरोबरच अत्याचार आणि गुन्हेगारीचाही बराच फैलाव झाला आहे.

न्यूयॉर्क : राजकीयदृष्ट्या दक्षिण सुदान जगातील सर्वांत तरुण देशांपैकी असला तरी या देशाने अद्यापही प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले नाही. 2011 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोनच वर्षांत येथे अंतर्गत यादवी माजली असून, ती अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे 2011 नंतर देशात जन्मलेल्या 34 लाख बालकांपैकी 26 लाख मुलेही युद्धकाळातच जन्माला आलेली आहेत, असे "युनिसेफ'ने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. 

सात वर्षे वय असलेल्या दक्षिण सुदानमधील अविरत संघर्षाच्या परिस्थितीमुळे लाखो मुलांचे भविष्य अंधकारमय झाल्याची खंत "युनिसेफ'च्या कार्यकारी संचालिका हेन्‍रिएटा एच. फोर यांनी व्यक्त केली आहे. आफ्रिका खंडातील सुदानमध्ये 2011 मध्ये सार्वमत होऊन दक्षिण सुदान हा नवा देश निर्माण झाला. त्यानंतर 2013 मध्ये अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. या संघर्षात मुलांच्या भविष्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

अनेक वर्षे विकासप्रक्रियेपासून दूर असलेला हा देश संघर्षामुळे अधिक असुरक्षित झाला असून, लाखो मुले शाळा, पोषक आहारापासून वंचित आहेत. रोगराईबरोबरच अत्याचार आणि गुन्हेगारीचाही बराच फैलाव झाला आहे. शाळा नसल्याने सरकारी सैन्य आणि बंडखोर यांच्यातील सशस्त्र संघर्षात ही मुले ओढली जात असून, तब्बल 19 हजार तरुण मुले बंडखोरांसाठी विविध प्रकारची कामे करत आहेत, असे "युनिसेफ'ने अहवालात म्हटले आहे. तरुण मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांची संख्या पाचशेपर्यंत गेली आहे. 

दक्षिण सुदानमधील विदारक परिस्थिती 

- अनेक भागामध्ये दुष्काळ, सरकार कर्तव्यहीन 
- देशातील 1/3 शाळा उद्‌ध्वस्त 
- मुले शाळेत न जाण्याच्या प्रमाणात दक्षिण सुदान जगात प्रथम क्रमांकावर 
- मदत पथकातील कार्यकर्त्यांनाही ठार मारण्याच्या घटना 

- 60 टक्के : नागरिक बेरोजगार 
- 10 लाख : बालके कुपोषित 
- 3 लाख : बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर 
- 20 लाख : मुले-मुली शाळेत जात नाहीत 
- 25 लाख : नागरिक देश सोडून पळून गेली आहेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The future of South Sudan is dark