नवाल्नी यांच्यावर सोव्हिएत काळातील 'नोव्हीचोक' रासायनिक अस्त्राचा वापर; जर्मनीने दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

२०१८ मध्येही रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांच्या राजकीय विरोधकावर अशाच रासायनिक अस्त्राचा वापर करण्यात आला होता.

बर्लिन- रशियातील राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांच्या शरीरात सोव्हिएत महासंघाच्या काळातील रासायनिक अस्त्रांच्या निर्मितीत वापरले जाणारे रसायन आढळले आहे. या रसायनाचे नाव नोव्हीचोक असे आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचे प्रवक्ते स्टीफन सिबर्ट यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जर्मनीतील लष्कराच्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. अहवालाची माहिती आम्ही युरोपीय महासंघातील जोडीदार देश तसेच नाटो सदस्यांना देऊ. रशियाला योग्य संयुक्त प्रतिसाद देण्याविषयी सल्लामसलत करण्यात येईल. २०१८ मध्येही रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांच्या राजकीय विरोधकावर अशाच रासायनिक अस्त्राचा वापर करण्यात आला होता.

विषप्रयोगाबाबत केलेल्या चाचण्यांचा तपशील पाठवण्याची रशियाची विनंती

राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाची शक्यता पडताळण्यासाठी केलेल्या चाचण्यांचा तपशील पाठवावा अशी विनंती रशियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी जर्मनीकडे केली आहे. रशियात विमान प्रवासात प्रकृती बिघडल्यानंतर नवाल्नी यांनी बर्लिनमधील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरळीत व्हावेत म्हणून कोमामध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता आहे.आरबीसी या रशियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सरकारी वकिलाच्या कार्यालयाने जर्मनीच्या न्याय मंत्र्यांशी संपर्क साधला आहे. 

चीनला भारताने पुन्हा दिला झटका; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

अंमली पदार्थ, विषारी द्रव्ये, अवजड धातू आणि चोलीनस्टेरेस द्रव्य याबाबत केलेल्या चाचण्यांचे अहवाल तसेच उपचाराविषयीची माहिती पाठवावी असे सांगण्यात आले आहे. नवाल्नी यांना मधुमेह किंवा इतर एखादे जुने दुखणे आहे का, रशियातून हलविण्यात आले तेव्हा केलेली रक्ताची जैवरासायनिक तपासणी तसेच मूत्र तपासणी याबाबतचे अहवालही पाठवावेत असे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सरकारी वकिलांच्या कार्यालयाकडून या वृत्तास दुजोरा मिळाला नाही. संवेदनशील ठरू शकेल अशा या विनंतीला जर्मनीकडून काय प्रतिसाद मिळाला याचीही माहिती मिळू शकली नाही. नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता रशिया सरकारने फेटाळून लावली आहे. ते आजारी पडण्यात कोणत्याही गुन्ह्याचा संबंध नाही असा त्यांचा दावा असून गुन्हेगारी आरोपावरून तशा चौकशीची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Germany says nerve agent Novichok found in Russia opposition leader Alexei Navalny