दोन पत्नी सांभाळणाऱ्या पतीला मिळणार घरभत्ता 

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

"यूएई'चे मूलभूत सेवा विकासमंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहेफ अल नुआमी यांनी याबाबतची घोषणा "फेडरल नॅशनल कौन्सिल'च्या अधिवेशनात बुधवारी (ता.28) केली. "शेख झायेद गृह योजने'अंतर्गत "यूएई'तील पुरुषांनी दुसरा विवाह केल्यास त्यांना घरभत्ता दिला जाणर आहे.

अबुधाबी : "दोन बायका फजिती ऐका' असे म्हटले जाते. दोन विवाह करणे हे समाजात मान्य केले जात नाही. संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मात्र दोन पत्नींना नांदविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दोन पत्नी असणाऱ्या पतीला अतिरिक्त घरभत्ता निर्णय "यूएई' सरकारने नुकताच घेतला आहे. 

"यूएई'चे मूलभूत सेवा विकासमंत्री डॉ. अब्दुल्ला बेलहेफ अल नुआमी यांनी याबाबतची घोषणा "फेडरल नॅशनल कौन्सिल'च्या अधिवेशनात बुधवारी (ता.28) केली. "शेख झायेद गृह योजने'अंतर्गत "यूएई'तील पुरुषांनी दुसरा विवाह केल्यास त्यांना घरभत्ता दिला जाणर आहे. पहिल्या पत्नीप्रमाणेच दुसरीच्या निवासाची व्यवस्था या योजनेअंतर्गत करण्यात येईल, असे नुआमी यांनी सांगितले. अविवाहित मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांना दुसरा विवाह करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे, असे "खलिज टाईम्स' या वृत्तांत म्हटले आहे. यासाठी मूलभूत सेवा विकास मंत्रालयाकडून घर देण्याची योजना आखली आहे, असे अहमद अल रहुमी यांनी सांगितले. 

"यूएई'त घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे दोन विवाह करणे पुरुषांना शक्‍य होत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सामाजिक व्यवस्थेतील दुर्बल घटकांना मदत करण्याची मागणी या वेळी सदस्यांनी केली. दुसऱ्या विवाहामुळे देशावरील आर्थिक बोजा वाढेल, अशी शंका काही सदस्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news allowence for husband in UAE