संबंधांचे रुपांतर संघर्षात नको; बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायडेन आणि जिनपिंग

संबंधांचे रुपांतर संघर्षात नको; बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत

बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा वास्तावाधारित आणि तर्कसुसंगत असावेत, अशी अपेक्षा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात आज झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आली. दोन्ही देशांमधील संबंधांचे रुपांतर संघर्षात होऊ नये, हा मुद्दा दोन्ही नेत्यांनी मान्य केला.

ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांची व्हर्च्युअल पद्धतीने का होईना, पण जिनपिंग यांच्याबरोबर प्रथमच समोरासमोर चर्चा झाली. या आधी दोन्ही नेते दोन वेळेस एकमेकांशी दूरध्वनीवरून बोलले आहेत. आजची बहुप्रतिक्षित बैठक दोन सत्रांमध्ये तीन तास चालली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत जिनपिंग आणि बायडेन यांनी धोरणात्मक चर्चा करण्याबरोबरच द्वीपक्षीय संबंधांबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. आर्थिक आणि भूराजकीय आघाडीवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी व्हावा, हा या चर्चेचा उद्देश होता.

हेही वाचा: बुलडाणा : तलाठ्यास लोटपोट करून गाडी खाली घेण्याची धमकी

चीनबाबतचे अमेरिकेचे धोरण पुन्हा एकदा वास्तवावर आधारित आखण्यासाठी बायडेन त्यांनी त्यांचे राजकीय नेतृत्व पणाला लावावे, अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. तर, संबंधांचे रुपांतर वादात होऊ नये ही दोन्ही नेत्यांची जबाबदारी असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.

आगीशी खेळू नका : चीनचा इशारा

या बैठकीत तैवानवरून असलेला वाद अधोरेखित झाला. तैवानच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे म्हणजे आगीशी खेळ आहे, असा इशारा जिनपिंग यांनी बायडेन यांना बजावले. ‘अमेरिकेतील काही लोक चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैवानचा वापर करत आहेत. हे आगीशी खेळण्यासारखेच आहे. जे लोक आगीशी खेळतात, ते जळून जातात,’ असे जिनपिंग यांनी सांगितल्याची माहिती चिनी माध्यमांनी प्रसिद्ध केली. बायडेन यांनीही बजावले की, तैवानला आपलाच प्रदेश समजणाऱ्या चीनची दडपशाही सहन केली जाणार नाही. तैवानला आम्ही स्वतंत्र मानत नसलो तरी नागरिकांच्या स्वसंरक्षणाला आमचा पाठिंबा आहे.

loading image
go to top