esakal | फेसबुकनुसार 'सनातन संस्था' धोकादायक
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुक
फेसबुकनुसार सनातन धोकादायक

फेसबुकनुसार 'सनातन संस्था' धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : धोकादायक व्यक्ती आणि संघटनांची फेसबुकने केलेली गोपनीय यादी अमेरिकेतील द इंटरसेप्ट वृत्त संघटनेने फोडली आहे. त्यात सनातन संस्थेसह भारतातील दहा संघटनांचा समावेश आहे. सुमारे चार हजार व्यक्ती व संघटनांची यादी फुटणे चर्चेचा विषय ठरले आहे. काळ्या यादीतील अर्ध्याहून जास्त व्यक्ती व संघटना संघटना पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि मुस्लीम देशांतील आहेत. याशिवाय श्वेतवर्णीयांचा वर्चस्ववाद मानणारे गट, सशस्त्र सामाजिक संघटना आणि दहशतवाद्यांनाही या यादीत टाकण्यात आले. वंचित गटांबाबत फेसबुकने खूप कठोर धोरणाचा अवलंब केल्याचे यातून स्पष्ट होते.

काळ्या यादीतील व्यक्ती-संस्थांबाबत प्रशंसा, प्रतिनिधित्व आणि पाठिंबा देणे आपल्या व्यासपीठावरून शक्य होऊ नये म्हणून तशा मजकूरावर बंदी घातली जाते आणि काही पोस्ट झाल्यास मजकूर हटविला जातो असे फेसबुकचे संचालक ब्रायन फिशमन यांनी सांगितले.

हेही वाचा: मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

द इंटरसेप्टच्या वृत्तानुसार फेसबुकने सुमारे एक हजार सशस्त्र गटांवर बंदी घातली आहे. ही यादी थेट अमेरिका सरकारकडून घेण्यात आली. न्यूयॉर्कवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन जॉर्ज डब्लू. बुश सरकारने निर्बंधांसाठी खास यादी तयार केली. विशिष्ट कारणांसाठी ठरविण्यात आलेले जागतिक दहशतवादी (स्पेशली डेझीग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट) अशी संज्ञा त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी फेसबुकने ६०० सशस्त्र सामाजिक संघटनांची यादी तयार केली होती. त्यांच्याशी संबंधित सुमारे २४०० पेजेस आणि त्यांच्याकडून चालविले जाणारे १४ हजार २०० ग्रुप्स हटविण्यात आले होते.

यादी अद्ययावत होते...

दी इंटरसेप्टने यादी फोडल्यानंतर सत्यतेविषयी फेसबुककडून कोणतीही थेट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. दहशतवादविरोध आणि धोकादायक संस्था हे हाताळण्यासाठी धोरण ठरविणाऱ्या विभागाचे संचालक ब्रायन फिशमन यांनी सलग ट्विट केल्या. ही यादी सर्वसमावेशक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेसबुक अशी यादी सतत अद्ययावत करते असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

ते म्हणाले की, ही यादी फुटली आहे. याबाबत मी खास करून आमच्यावरील कायदेशीर बंधनांबाबत काही मुद्दे मांडू इच्छितो. मला काही त्रुटी सांगायच्या आहेत. आम्ही अशी यादी जाहीर करीत नाही. धोकादायक संस्थांना नियमांतून पळवाट काढण्याची संधी मिळू नये, त्यांना कायदेशीर चौकट आणि सुरक्षाविषयक धोक्यांना बगल देता येऊ नये हाच यामागील उद्देश असतो.

भारतातील संस्था

१) सनातन संस्था,

२) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी), ३) नागालँड राष्ट्रीय समाजवादी परिषद (इसाक-मुईवाह), ४) अखिल त्रिपुरा टायगर फोर्स

५) कांग्लैपॅक कम्युनिस्ट पक्ष

६) खलिस्तान टायगर फोर्स

७) पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांग्लैपॅक

८) इंडियन मुजाहिदीन

९) जैश-ए-महंमदशी संलग्न असलेले अफजल गुरू स्क्वाड

१०) इस्लामिक स्टेट व तालिबानला पाठिंबा देणारे विविध स्थानिक गट व उपगट (भारतासह इतर देशांतूनही सक्रिय)

मजकूराबाबतची फेसबुकची पद्धत

  • मजकुराबाबत धोरणात्मक अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय पद्धत

  • सर्वाधिक निर्बंध असलेल्या पहिल्या श्रेणीत दहशतवादी गट, द्वेषमूलक गट, गुन्हेगारी संघटना

  • दुसऱ्या श्रेणीत बिगरसरकारी हिंसक गट, सशस्त्र बंडखोर

  • तिसऱ्या श्रेणीत निर्बंध कमी, जे सशस्त्र सामाजिक संघटनांना लागू

  • या संघटनांमध्ये बहुतांश अमेरिका सरकारविरोधी उजव्या विचारसरणीचे सशस्त्र गट, यातील बहुतांश श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादाचे समर्थन करणारे

  • अशा कोणत्याही संस्थेला फेसबुकच्या व्यासपीठावर अस्तित्व निर्माण करू दिले जात नाही

loading image
go to top