थोर संशोधक हरपला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मानवाच्या कल्पनाशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून विचारशक्ती घडविणारे शिल्पकार आणि माझ्या वडिलांचे मार्गदर्शक स्टीफन हॉकिंग यांना सुमारे दशकभरापूर्वी भेटण्याची संधी मला मिळाली होती. हॉकिंग यांच्या भेटीचा तो क्षण माझ्यासाठी मौल्यवान ठरला. 

मानवाच्या कल्पनाशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून विचारशक्ती घडविणारे शिल्पकार आणि माझ्या वडिलांचे मार्गदर्शक स्टीफन हॉकिंग यांना सुमारे दशकभरापूर्वी भेटण्याची संधी मला मिळाली होती. हॉकिंग यांच्या भेटीचा तो क्षण माझ्यासाठी मौल्यवान ठरला. 

सुमारे दशकभरापूर्वी सर स्टीफन हॉकिंग हे भारत भेटीवर आले होते. माझे बाबा डॉ. तु. ह. दाते व सर हॉकिंग तीस वर्षे अवकाशातील निरनिराळ्या विषयांवर अभ्यास व विचारविनिमय करत असल्यामुळे मला त्यांच्या भेटीची प्रचंड उत्सुकता होती. सर हॉकिंग यांच्या भारत दौऱ्यामध्ये ते मुंबईतील कुलाबा येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संशोधन संस्थेला भेट देणार होते. माझ्या वडिलांच्या संशोधनाच्या ख्यातीमुळे मला सर हॉकिंग यांच्या समोर बसून संवाद साधण्याचा योग आला. या वेळी झालेल्या चर्चेत मी केलेला चालण्याचा जागतिक विक्रम आणि पुण्यातील पर्वती चढण्या-उतरण्याच्या गिनेस बुकमध्ये नोंद झालेल्या माझ्या विक्रमाबद्दल मी सर हॉकिंग यांना सांगितले. त्यावर सर हॉकिंग यांनी मला पटकन प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या संगणकावर लेखी संकेत टाइप केला. ‘‘अरे वा! म्हणजे तू तर असा मनुष्य आहेस, ज्याला चालण्याचे महत्त्व सर्वाधिक समजले असेल. आमच्यासारख्या चालता न येणाऱ्या विकलांग व्यक्तींना चालण्याचे मोल समजू शकते,’’ अशी प्रतिक्रिया सर हॉकिंग यांनी दिली. 

या वेळी त्यांनी भारतामधील नावाजलेल्या पर्यटनस्थळी विकलांग लोकांसाठी सोयी-सुविधा नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांच्या आग्रहाखातर दिल्लीच्या कुतूबमिनार येथे व्हीलचेअरसाठी खास व्यवस्था तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आज सर हॉकिंग स्वर्गवासी झाले. व्हीलचेअरवर बसून पार्वतीवर भ्रमण करण्याचे त्यांचे आणि माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. ‘अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम’ हे पुस्तक लिहिणाऱ्या, जगप्रसिद्ध संशोधक, योद्‌ध्याला मनाचा मुजरा. त्यांच्या निधनामुळे एक परिवर्तनात्मक संशोधक आणि पूर्ण विकलांग असूनही अचाट कल्पनाशक्तीच्या जोरावर ब्रह्मांडात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा थोर शास्त्रज्ञ हरपला आहे.

- जितेंद्र तुळशीराम दाते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news stephen hawking dies jitendra date