तंदुरुस्त शरीरासाठी थंडी लाभदायी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

वॉशिंग्टन - सुदृढ व बळकट शरीरासाठी बहुतेक जण व्यायामशाळेत (जिम) जातात. तेथे घाम येईपर्यंत व्यायाम करून शरीरातील उष्मांक कमी करताना दिसतात. पण आता जिममध्ये घाम न गाळताच तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग निघाला आहे. जोरदार थंडीचा सामना केल्यानेही उष्मांकांचे ज्वलन होऊन शरीर नियंत्रणात राहू शकते, असा शोध अमेरिकेतील "जॉस्लिन डायबेट सेंटर'मधील संशोधकांनी लावला आहे. 

चरबी नियंत्रक संप्रेरके ज्याला "लिपोकिन्स' असेही म्हणतात, याचा सविस्तर अभ्यास प्रथमच करण्यात आला. थंडीत शरीराला ऊब देताना होणारे चरबीचे ज्वलन शरीराला लाभदायी ठरते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. शरीरातील चयापचय प्रक्रियेसंदर्भात संशोधन करताना आम्हाला नवा शोध लागला. शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करून चरबीचे नियंत्रण करण्यासाठी थंडी उपयुक्‍त ठरते, असे आढळून आल्याची माहिती "जॉस्लिन'च्या "इंटग्रेटिव्ह मेटाबोलिझम अँड फिजिओलॉजी' विभागाचे प्रमुख व "सेल मेटाबोलिझम'मधील लेखाचे लेखक डॉ. लॉरी गुडइयर यांनी सांगितले. 

याविषयीचे संशोधन मनुष्य व उंदरावरही करण्यात आले. जी माणसे किंवा सस्तन प्राणी अति थंडीमध्ये जगतात, त्यांच्या चरबीतील "लिपोकिन्स'चा वापर केला जातो. यामुळे ऊर्जा खर्च अधिक होऊन चयापचय क्रियेसाठी फायदेशीर ठरते. हाच प्रयोग आम्ही व्यायाम करणाऱ्यांवर केला असता, दोन्हींचे परिणाम सारखेच दिसल्याचे गुडइयर म्हणाले. 

व्यायामाच्या पद्धती व त्याचे फायदे यापेक्षा चयापचयांसंदर्भातील रोगांना कसे तोंड द्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 
डॉ. लॉरी गुडइयर, संशोधक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For good health Winter is beneficiary