ऑक्सफर्ड लशीबाबत आनंदाची बातमी; ब्रिटनने सांगितलं केव्हा होणार लॉन्चिंग!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची वाट पाहणाऱ्या जगासाठी ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आली आहे.

नवी दिल्ली- ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची वाट पाहणाऱ्या जगासाठी ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आली आहे. ब्रिटिश सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑक्सफर्डची कोविड-१९ लस ६ आठवड्यात म्हणजे ४२ दिवसांमध्ये तयार होऊ शकते. सरकारची लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी ब्रिटनमध्ये कायद्यात बदल केला जात आहे. याअंतर्गत, ज्या क्षणी वैज्ञानिक लशीच्या यशस्वीतेची घोषणा करतील, तेव्हापासूनच या लशीचा वापर गंभीर असणाऱ्या रुग्णांवर करता येणार आहे.

‘मन की बात’ला लोकांची मिळेना साथ; गेल्या 6 वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळ

ब्रिटिश माध्यमात छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, एका ब्रिटिश अधिकाऱ्याने संडे एक्सप्रेसला सांगितलं की ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी आणि इंपीरियल कॉलेजची कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही उमेदवार वेगवेगळ्या कोरोना लशीवर काम करत आहेत. सर्व काही सुरळीत पार पडलं तर कोरोनावरील ऑक्सफर्डची प्रभावी लस ६ आठवड्यांमध्ये तयार होईल.

कोरोना लस प्रभावी ठरल्यास काही महिन्यातच याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु होईल. त्यामुळे काही काळातच ब्रिटनच्या पूर्ण लोकसंख्येला लशीचा डोस देण्यात येईल. सर्व काही योग्य पद्धतीने झालं तर २०२१ वर्षात जनजीवन पुन्हा सुरळीत होईल, असंही अधिकाऱ्याने म्हटलं आहे. असे असले तरी ब्रिटन सरकार अजूनही देश पूर्णपणे सुरु करण्याच्या तयारीत नाही. सरकार सतर्कतेने प्रत्येक पाऊल उचलत आहे.

यूके लशीच्या टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांनी ऑक्सफर्डच्या लशीबाबत आशावादी असल्याचं म्हटलं आहे. मात्र, आपण आपलं काम करत रहाणं महत्वाचं आहे, आनंदात काही विसरुन चालणार नाही. लशीवर सध्या तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु आहे. जेव्हा वैज्ञानिक या लशीच्या सुरक्षिततेबाबत खात्री देतील, तेव्हा त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात येईल. शिवाय ख्रिसमसपूर्वी ही लस लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.

प्रशांत भूषण १ रुपयाचा दंड भरणार? ट्विट करुन दिलाय संकेत

लशीच्या विकास कामाशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितलं की, कोविड लशीच्या परिक्षणातून खूप चांगली माहिती मिळत आहे. सुरुवातील आम्हाला या आजाराला ट्रॅक करण्यासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, आता आम्हाला अप-टू-डेट माहिती मिळत आहे. त्यामुळे लशीच्या विकासाची शक्यताही वाढली आहे.

सर्वात आधी कोणाला देणार लस?

ब्रिटनच्या लस टास्कफोर्सचे प्रमुख केट बिंघम यांच्या अंदाजानुसार, वयस्कर आणि तरुणांना वेगवेगळी लस देण्यात येण्याची शक्यता आहे. कारण या दोघांची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. लस देण्यासाठी ६५ वर्षांवरील व्यक्तींना जास्त प्राधान्य देण्यात येईल. तसेच, दूसऱ्या आजारांनी त्रस्त असलेले, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ही लस सर्वात आधी देण्यात येईल.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news from oxford university britain announces corona vaccine launching date