जूनअखेरपर्यंत करा घरुनच काम... वाचा सविस्तर 

पीटीआय
Wednesday, 29 July 2020

गुगलने जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला होता. आता त्यात वाढ केल्याने त्याचा फायदा गुगलच्या जगभरातील जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

माउंटन व्ह्यू (अमेरिका) - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घरून काम करण्याची संस्कृती वेगाने विकसीत होत असल्याचे दिसून येत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ ही पद्धत नवीन नसलेल्या गुगलने यात एक पाऊल पुढे टाकत आपल्या बहुतेक कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी जून अखेरीपर्यंत घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. संसर्गापासून कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा, यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल द्वारे ही माहिती दिली आहे. ‘जगभरातील आमच्या कर्मचाऱ्यांना कामाचे आणि इतर बाबींचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी आम्ही त्यांना घरून काम करण्याचा पर्याय ३० जून, २०२१ पर्यंत खुला ठेवत आहोत. जे काम करण्यासाठी ऑफिसमध्ये येण्याची आवश्‍यकता नाही, असे काम करणाऱ्यांना ही सवलत देण्यात येत आहे,’ असे पिचाई यांनी ईमेलवर म्हटले आहे. गुगलने जानेवारीपर्यंत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला होता. आता त्यात वाढ केल्याने त्याचा फायदा गुगलच्या जगभरातील जवळपास दोन लाख कर्मचाऱ्यांना होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. गुगल कंपनीचा हा कित्ता माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर बड्या कंपन्याही गिरविण्याची शक्यता आहे. बड्या कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी येत्या काही महिन्यात आपली कार्यालये सुरु करण्याचा विचार व्यक्त केला होता. ट्वीटरने मात्र आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अनिश्‍चित काळासाठी घरुनच काम करण्यास परवानगी देणार असल्याचे म्हटले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google will allow most employees to work from home