‘शाळा बंद’साठी शिक्षक आक्रमक; ब्रिटन सरकारवर संघटनांचा दबाव

‘शाळा बंद’साठी शिक्षक आक्रमक; ब्रिटन सरकारवर संघटनांचा दबाव

लंडन - कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ब्रिटनमधील बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत असतानाच येथील सरकारवर शिक्षकांकडून शाळा बंद ठेवण्यासाठी दबाव येत आहे. संसर्ग वाढत असल्याने इंग्लंडमधील शाळा आणखी दोन आठवडे बंद ठेवाव्यात, अशी शिक्षकांची मागणी आहे. 

कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी भर पडत असल्याने ब्रिटन सरकारने लंडनमधील शाळा पुढील आठवड्यापर्यंत बंद ठेवल्या आहेत. हेच धोरण संपूर्ण इंग्लंडसाठी लागू करावे, यासाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांना संसर्गाचा धोका असल्याने आणखी किमान दोन आठवडे शाळा बंद ठेवाव्यात, असे या संघटनांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांत ५७ हजार ७२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्याही ७५ हजारांच्या जवळ गेली असल्याने ब्रिटन हा कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरत आहे. संसर्ग वाढत असल्याने आगामी काही दिवसांमध्ये ब्रिटनमधील कोरोना बळींची संख्याही वाढण्याची शंका व्यक्त होत आहे. गेल्या पाच दिवसांत देशात दररोज ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ७० टक्के अधिक  संसर्गजन्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.   

देशातील नॅशनल एज्युकेशन युनियनने काल तातडीने बैठक घेत पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आणखी दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने घरूनच शिक्षण घेण्याचे धोरण राबविण्याची विनंती केली. ही संघटना साडे चार लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते. असुरक्षित वातावरणात काम करण्यास नाकारणे हा कर्मचाऱ्यांचा हक्कच आहे, असेही संघटनेने आपल्या सदस्यांना सांगितले आहे. इतरही काही शिक्षक संघटनानी ऑनलाइन शिक्षणच सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. आपल्या सदस्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ते कठोर पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे. 

रुग्णालये पुन्हा भरली
सुरुवातीचा भर ओसरल्यानंतर ब्रिटनमधील रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा सर्व रुग्णालये जवळपास भरली असून सुटीनंतर परत आलेल्या नागरिकांना संसर्ग झाल्यास त्यांच्यावर कोठे उपचार करायचे, ही चिंता सरकार आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावत आहे. पुन्हा एकदा तात्पुरती रुग्णालये उभारण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. 

लसीकरणाचा वेग वाढविणार
ब्रिटनने फायझर कंपनीच्या लशीला मान्यता देऊन ८ डिसेंबरला लसीकरण मोहिमही सुरु केली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी ऑक्सफर्डच्या लशीलाही मान्यता दिली आहे. उद्यापासून (सोमवार) लसीकरणाला आणखी वेग आणण्याचे नियोजन सरकारने आखले असून या आठवड्यात जवळपास वीस लाख नागारिकांना लस टोचण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com