एच-4 व्हिसाबद्दल ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा भारतीयांना बसू शकतो फटका

वृत्तसंस्था
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

एच-4 व्हिसा काढून घेण्याच्या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याची सर्वांना संधी देण्याची तयारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दर्शविली आहे. एच-1 बी व्हिसा असणाऱ्यांच्या पत्नीला अथवा पतीलाही अमेरिकेत काम करण्याची संधी एच-4 व्हिसाद्वारे दिली जात असून, स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी ही पद्धत बंद करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. 

 वॉशिंग्टन : एच-4 व्हिसा काढून घेण्याच्या प्रस्तावावर प्रतिसाद देण्याची सर्वांना संधी देण्याची तयारी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने दर्शविली आहे. एच-1 बी व्हिसा असणाऱ्यांच्या पत्नीला अथवा पतीलाही अमेरिकेत काम करण्याची संधी एच-4 व्हिसाद्वारे दिली जात असून, स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी ही पद्धत बंद करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार आहे. 

एका संस्थेच्या अहवालानुसार सध्या अमेरिकेत एच-4 व्हिसा स्विकारणाऱ्यांमध्ये 4 पैकी तीन लोक हे भारताचे असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या अमेरिकेत 419,637 एवढे लोक एच-4 व्हिसाधारक आहेत. त्यापैकी 309,986 एवढे लोक भारतीय आहेत.

एच-4 व्हिसा पद्धत बंद झाल्यास त्याचा तेथील भारतीयांना मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेत एच-बी व्हिसा घेऊन काम करणारे लाखो भारतीय असून, त्यातील अनेकांचे जोडीदारही एच-4 चा आधार घेत नोकरी करतात. कौशल्यपूर्ण विदेशी नागरिकांना एच-1 बी व्हिसाद्वारे अमेरिकी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळत असली, तरी त्यांचे जोडीदार तितके कौशल्यपूर्ण असतीलच असे नाही. ट्रम्प प्रशासनाने सध्या केवळ कौशल्यपूर्ण विदेशी नागरिकांनाच प्रवेश देण्यावर भर दिला आहे. मात्र, एच-4 व्हिसा बंद केल्यास त्याचे अनेक दुष्परिणामही होतील, भारतीयांप्रमाणेच अनेक जण नोकऱ्या सोडून परत जातील आणि परिणामी देशाचे नुकसान होईल, अशी भीती अनेक खासदार आणि कंपन्यांनी व्यक्त करीत सरकारला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे, सर्वांचे मत विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन ट्रम्प प्रशासनाने दिले आहे. 

व्हिसा रोखण्याच्या प्रमाणात वाढ 
एच-1 बी व्हिसा रोखून धरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे. व्हिसा रोखून धरणारी अमेरिकेचा नागरिकत्व आणि स्थलांतर विभाग त्यांच्या मर्यादेच्या बाहेर हस्तक्षेप करीत असल्याची तक्रारही या कंपन्यांच्या संघटनेने केली आहे. या संघटनेमध्ये गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: H-1B: Trump’s latest visa proposal and its impact on India