नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार; पूर आणि भुस्खलनामुळे 10 लोकांचा मृत्यू , 40 बेपत्ता

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

नेपाळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत

काटमांडू- नेपाळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 24 तासात नेपाळमधील वेगवेगळ्या जिल्ह्यात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 40 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. अनेकांचे घर उद्धवस्त झाले आहेत. 'एएनआय'ने याबाबतचे वृत्त दिवे आहे.
 
नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल
नेपाळच्या सिंधुपालचौक जिल्ह्यात पुरामुळे कमीतकमी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलणामुळे नेपाळ आणि चीनच्या सीमेवर ततोपानी-झांगमू पॉईंटला जोडणाऱ्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद ठेवावी लागणार आहे.

बरहाबिसे नगर पालिकेत 11 घर वाहून गेले आहेत. तसेच 14 लोक बेपत्ता झाले असून तीन लोक यात गंभीर जखमी झाले आहेत. भोटेकोशी नगरपालिकेत 2 घर वाहून गेले असून 4 लोक बेपत्ता आहेत, तर दोघेजण जखमी झाल्याची माहिती सिंधुपालचौक जिल्हा प्रशासन कार्यालयाचे मुख्य जिल्हा अधिकारी उमेश कुमार ढकाल यांनी दिली आहे. तसेच मृत्यू झालेल्यांचा आणि बेपत्ता झालेल्या लोकांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Vikas Dubey Encounter: अटकेपासून ते एन्काउंटरपर्यंत नेमकं काय घडलं
राजधानी काटमांडूजवळ नेपाळ-चीन सीमा पॉईंटला जोडणारा अरानिको राजमार्गाचे कमीतकमी सात ठिकाणी नुकसान झाल्याचे ढकाल यांनी सांगितले आहे. यामुळे चीन आणि नेपाळमधील व्यापार काही दिवसांसाठी थांबण्याची शक्यता आहे.  कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर ततोपानी-झांगमू सीमा पॉईंट मार्च महिन्यामध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच हा मार्ग पुन्हा सुरु करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heaivy rain in nepal 10 died and 40 missing flood and landslide