पाकिस्तानला पावसाचा तडाखा महिला व मुलांसह 28 जणांचा मृत्यू

पीटीआय
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पाकिस्तानमध्येही मॉन्सूनच्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. देशभरात पावसामुळे महिला व मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांत पूर आला असून दरडी कोसळल्या आहेत, अशी माहिती रविवारी (ता. 11) दिली. 

कराची/ पेशावर : पाकिस्तानमध्येही मॉन्सूनच्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. देशभरात पावसामुळे महिला व मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांत पूर आला असून दरडी कोसळल्या आहेत, अशी माहिती रविवारी (ता. 11) दिली. 
खैबर पख्तुनवातील विविध भागांत पूर, भूस्खलन व पावसामुळे अन्य घटनांत 12 जणांचा बळी गेला, तर 22 जण जखमी आहेत, असे विभागीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. यात दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. 

चित्राल जिल्ह्यात लावारी बोगद्याचे काम करणाऱ्या चिनी अभियंत्यांसाठी बांधलेली वसाहत पुराच्या पाण्यात गेली. सुदैवाने सर्व अभियंत्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. कोहिस्तान जिल्ह्यात सिंधू नदीत वाहन पडल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. ईद साजरी करण्यासाठी ते सर्वजण गिलगिटहून दिर जिल्ह्यात चालले होते. 

कराचीत शनिवारी (ता. 1) रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे येथे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली आहेत. पावसामुळे निम्म्या कराची शहरातील वीजपुरवठा आज खंडित करण्यात आला. पाकिस्तानच्या हवामान विभागाच्या (पीएमडी) नोंदीनुसार कराचीत आतापर्यंत 150 मिलिमीटर पाऊस पडला. 1992पासून कराचीतील हा सर्वाधिक पाऊस आहे, असे "पीएमडी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बकरी ईदनिमित्त सोमवारी (ता. 12) कुर्बानी देण्यासाठी येथे विक्रत्यांनी जनावरे आणली आहेत. त्यातील डझनभर जनावरांचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. 

कराचीत राष्ट्रीय आपत्ती? 

पावसाच्या तडाख्याने कराचीत जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वत्र पुराचे पाणी पसरले असून जीवित व वित्तहानी झाली आहे. "पावसामुळे कराचीत गंभीर परिस्थिती उद्‌भवली आहे. यामुळे येथे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी,' असे आवाहन कराची वीज मंडळाने ट्विटद्वारे शहर प्रशासनास केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Pakistan women and children Died