शहरी कावळ्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

फास्ट फूडमुळे चक्क कावळ्यांच्याही रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ग्रामीण भागातील कावळ्यांपेक्षा जास्त असल्याचे एका अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे

न्यूयॉर्क: तुम्ही आजपर्यंत, फास्ट फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरिरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असे नेहमी एकले असेल. परंतु शहरी संस्कृतीचा भाग असलेल्या फास्ट फूडमुळे चक्क कावळ्यांच्याही रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ग्रामीण भागातील कावळ्यांपेक्षा जास्त असल्याचे एका अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून शहरातील कावळ्यांच्या रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण ग्रामीण भागातील प्रमाणापेक्षा अधिक आहे. शहरात उरलेल्या किंवा टाकून दिलेल्या अन्नपदार्थांवर कावळ्यांचे पोट भरत असते. या अभ्यासाचा अहवाल "द कोन्डॉर ओर्निथोलॉजिकल एप्लिकेशन' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. शहरी लोक फेकून देत असलेल्या चीज बर्गरमुळे हा फरक दिसून येत असल्याचा अंदाज आहे. अभ्यासकांनी कॅलिफोर्नियातील (अमेरिका) ग्रामीण आणि शहरी कावळ्यांची रक्तचाचणी घेतली आहे. या अभ्यासकांनी न्यूयॉर्कमधील मॅकडोनॉल्डच्या उरलेल्या चीजबर्गर पडलेल्या ठिकाणच्या कावळ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यांच्यातील कोलेस्टेरॉल इतर भागातील आणि ग्रामीण भागातील कावळ्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात मोठी तफावत होती. शहरी फास्टफूड खाण्यामुळे कावळ्यांच्याही कोलेस्टेरॉलमध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High cholesterol levels in urban crows