ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत हिंदूजा बंधू पुन्हा अव्वल स्थानी

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

- ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत हिंदूजा बंधू पुन्हा अव्वल स्थानी 
- 22 अब्ज पौंड मालमत्ता
-  रुबेन बंधू दुसऱ्या क्रमांकावर 
- यादीत लक्ष्मी मित्तल (11) अनिल अगरवाल (12) श्री प्रकाश लोहिया (26) स्वराज पॉल (69)  यांचाही समावेश

लंडन ः ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, त्यांची मालमत्ता 22 अब्ज पौंड असून, मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू 18.66 अब्ज पौंडच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रीचंद व गोपीचंद हिंदूजा संचलित ब्रिटनमधील हिंदूजा ग्रुप ऑफ कंपनीने 1.35 अब्ज पौंडचा नफा कमविला आहे. यापूर्वी 2014 व 2017 मध्ये हिंदूजा बंधू श्रीमंताच्या या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश व अशोक हिंदूजा यांच्या नियंत्रणाखाली विविध क्षेत्रांतील जवळपास 50 कंपन्या असून, त्यांची वार्षिक उलाढाल 40 अब्ज पौंड आहे. तिथेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड व सायमन रुबेन यांच्या मालमत्तेत यंदा 3.56 अब्ज पौंडांची भर पडली आहे. रियल इस्टेट व विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार असलेल्या रुबेन बंधूंनी गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये 1 अब्ज पौंडाची मालमत्ता खरेदी केली आहे. 

या यादीत गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेले ब्रिटिश उद्योजक जिम रॅटक्‍लिफ यंदा तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. दरम्यान, मूळ भारतीय वंशाच्या सुनील वासवानी व लॉर्ड डॉलर पोपट या उद्योजकांना यादीत प्रथमच स्थान मिळाले आहे. संडे टाइम्सकडून दरवर्षी ब्रिटमधील एक हजार श्रीमंतांची यादी जाहीर केली जाते. क्रमवारी ठरवताना प्रामुख्याने जमीन, कंपन्यांमधील समभाग व इतर मालमत्ता विचारात घेतली जाते. यात बॅंक खात्यांमधील रकमेचा समावेश नसतो. 

यादीत यांचाही समावेश 
- लक्ष्मी मित्तल (11) 
- अनिल अगरवाल (12) 
- श्री प्रकाश लोहिया (26) 
- स्वराज पॉल (69) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinduja brothers top UK rich list Reuben brothers second