हिरोशिमाची 75 वर्षे! 'लिटल बॉय'ने दीड लाख लोकांचा घेतला होता जीव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

बैरुतमध्ये झालेल्या स्फोटामुळे 75 वर्षांपूर्वी झालेल्या हिरोशिमावरील हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अमेरिकेने १९४५ च्या ऑगस्ट महिन्यात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले आणि दुसरं महायुद्ध संपलं.

पुणे - ज्वलनशील पदार्थांमुळे लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे जपानमधील हिरोशिमा आणि नागासकी शहरांमध्ये झालेल्या विध्वंसाची आठवण पुन्हा झाली. विशेष म्हणजे हिरोशिमावरील हल्ल्याला 6 ऑगस्ट 2020 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमेरिकेने १९४५ च्या ऑगस्ट महिन्यात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले आणि दुसरं महायुद्ध संपलं. अणुबाँब टाकल्याच्या या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या स्फोटांमुळे झालेली मानवी हानी हादरवून टाकणारी होती. या धक्क्यामुळेच त्या अणुबाँबपेक्षाही भयानक अस्त्रे निर्माण झाली असली तरीही त्यांचा वापर न करण्यासाठी सर्वच देश पुढाकार घेताना दिसतात.

हिरोशिमा शहरासाठी 6 ऑगस्ट 1945 रोजीची सकाळ 70 हजार नागरिकांसाठी काळ बनून आली होती. सकाळी सव्वा आठच्या सुमारास शहरावर 600 मीटरवर लिटल बॉय अणुबाँबचा स्फोट झाला आणि यात 70 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील 90 टक्के भाग बेचिराख झाला होता. स्फोट झाला तेव्हा मृत्यू झालेल्यांच्या संख्येत पुन्हा परिणाम म्हणून तेवढीच भर पडली. या हल्ल्यामुळे एकूण 1 लाख 40 हजार जणांचा मृत्यू झाला.

हे वाचा - भयंकर! स्फोटानंतर उद्ध्वस्त झालेल्या बैरुतचे सॅटेलाइट PHOTO व्हायरल

लिटल बॉयने उद्ध्वस्त केलं हिरोशिमा 
लिटल बॉय या बाँबची उंची तीन मीटर इतकी होती. हा एक युरेनियम बाँब होता. याची हल्ला करण्याची क्षमता 13 ते 16 किलोटन टीएनटी इतकी होती. बाँब हल्ला करताना युरेनियमचा एक कण इतर कणांवर आदळवण्यात आला होता.

नागासाकीवर 'फॅट मॅन'चा हल्ला
अमेरिकेनं हिरोशिमानंतर नागासाकीवर 9 ऑगस्टला हल्ला केला होता. यामध्ये 74 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. 9 ऑगस्ट 1945 ला सकाळी 11 वाजून 02 मिनिटांनी नागासाकीवर फॅट मॅनचा हल्ला केला. शहराच्या 500 मीटरवरून फॅट मॅनचा हल्ला झाला. यामध्ये बाँबमधील घटकाच्या बाह्य आवरणाचा दाब वाढून प्लुटोनियमच्या केंद्रकाचा स्फोट घडवून आणला होता. याची उंची 3.25 मीटर इतकी होती. याची क्षमता 19 ते 22 किलोटन टीएनटी इतकी होती. 

हे वाचा - बैरुतमधील स्फोटाने चर्चेत आलेला लेबनॉन आधीपासूनच संकटात!

लेबनॉन स्फोटास ज्वलनशील पदार्थ कारणीभूत
लेबनॉनच्या बंदरालगतच्या राजधानीत मंगळवारी झालेल्या शक्तीशाली स्फोटास ज्वलनशील पदार्थ कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न होत आहे. सुरुवातीला फटाक्यांना आग लागून अमोनियम नायट्रेटने पेट घेतल्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली. 

Edited By - Suraj Yadav
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hiroshima atomic bombing little boy 75 years