होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय

होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय
Summary

पर्ल हार्बरवर हल्ला झाला, तेव्हा काळात फ्रॅन्कलिन डी रूझवेल्ट अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या भाषणात पर्ल हार्बरवरील हल्ल्याचे वर्णऩ `ए डे विच विल लीव्ह इन इनफेमी’ असे केले.

मुक्काम होनोलुलु, हवाई (अमेरिका) : होनोलुलुतील पर्ल हार्बर (Pearl Harbour) येथे दुसऱ्या जागतिक युद्धाचे ऐतिहासिक संग्रहालय असून, तब्बल 80 वर्षापूर्वी 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने (Japan) केलेल्या भीषण हल्ल्याचे चित्र डोळ्यापुढे उभे राहाते. होनोलुलु हे ओआऊ बेटावर वसले आहे. 9 जानेवारी रोजी या संग्रहालयाला मी भेट दिली, तेव्हा सारा इतिहास मनःश्चक्षुपुढे उभा राहिला. दक्षिणपूर्व आशिया, ब्रिटन (Britain), द नेदरलँड्स व अमेरिकेवर हल्ले करण्याचे मनसुबे जपानने रचले होते. त्यात अमेरिकेने (America) हस्तक्षेप करू नये, या इराद्याने व अमेरिकेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी जपानने हा हल्ला केला. जपानचे एडमिरल इसोकोरू यामामोटो यांनी त्यासाठी महिनोनमहिने त्याचे अचूक नियोजन केले होते.

हल्ल्यात अमेरिकन नौदलाचे 2390 अधिकारी, सेलर्स ठार व 1178 लोक जखमी झाले. अमेरिकेची 18 लढाऊ जहाजे नष्ट अथवा नादुरूस्त तर झालीच, पण प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या या तळावर उभी असलेली 178 लढाऊ विमाने बेचिराख व 159 विमाने (एकूण 337) नादुरूस्त झाली. जपान्यांनी पहिला हल्ला सकाळी 7.48 वाजता केला व त्यानंतर अवघ्या तीस मिनिटांनी दुसरा हल्ला केला. त्यात 21 जहाजे बुडाली अथवा ना निकामी झाली. त्यातील एसएसएस एरिझोना, ओक्लाहामा, यूटा या जहाजांची संग्रहालये येथे असून, त्यातील एसएसएस एरिझोनाचे संग्रहालय सर्वात महत्वाचे मानले जाते. येथे उभारलेल्या संग्रहालयाच्या इमारतीतून बुडालेल्या एसएसएस एरिझोनाचा बराचसा भाग स्पष्ट दिसतो. वस्तुतः अमेरिकेचा हा नौतळ बऱ्याच अर्थाने सज्ज परंतु गाफील होता, म्हणून जपानचा हल्ला यशस्वी झाला.

होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय
रशिया युक्रेनवर कब्जा करणार काय ?

65 दशलक्ष डॉलर्स खर्चून 17 एकरात उभारलेल्या या संग्रहालयाला पाहण्यास दर वर्षी जगातून 18 ते 20 लाख पर्यटक येतात. एसएसएस एरिझोनाच्या हल्ल्यातून वाचलेले लोऊ कॉन्टर व केन पॉट्स हे नौदल अधिकारी आजही हयात आहेत. रेडिओ अधिकारी ग्लेन हार्वे लेन ही वाचला. त्यानंतर नौदलात तीस वर्षे सेवा करून तो निवृत्त झाला.

दुसऱे महायुद्ध होण्यापूर्वी जागतिक सत्तांच्या दरम्यान पडलेल्या दोन तटात जपान, जर्मनी व इटली (एक्सिस पॉवर्स) एकीकडे, व त्या विरूद्ध फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, अमेरिका व सोव्हिएत महासंघ (अलाइड पॉवर्स) दुसरीकडे, असे चित्र होते. आशिया व अन्यत्र असलेल्या युरोपीय वसाहती व वर्चस्व संपुष्टात आणून आशिया व प्रशांत महासागरात आपली सत्ता स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षेने भारलेल्या जपानने पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर थायलँड, मलेशिया, फिलिपीन्स, हाँगकाँग, गिलबर्ट व वेक बेटे व यांना ताब्यात घेतले. सिंगापूर, बर्मा (म्यानमार), न्यूगिनी बेटांवर हल्ले चढविले. अमेरिकेची आट्टू व किस्का ही बेटे घेतली. तत्पूर्वी 1910 मध्ये जपानने चीन व रशियाला युद्धात पराभूत करून कोरिया व फॉर्मोसाला संल्ग्न करून मांचुरियावर ताबा केला होता. ब्रिटनची सत्ता असलेल्या भारतावरही जपानने हल्ला चढविला. त्यापैकी कोहिमा (नागालँड) व इम्फाळ (मणिपूर) येथे झालेली दोन युद्धे निर्णायक ठरली. त्यात जपानी सैन्याचा मोठा पराभव झाला.

पर्ल हार्बरवर हल्ला झाला, तेव्हा काळात फ्रॅन्कलिन डी रूझवेल्ट अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या भाषणात पर्ल हार्बरवरील हल्ल्याचे वर्णऩ `ए डे विच विल लीव्ह इन इनफेमी’ असे केले. या हल्ल्यामागे अमेरिकेचे नौदल उद्धवस्त करण्याची योजना होती. रूझवेल्ट यांच्या नंतर आलेले अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी पराभवाचा वचपा काढून जपानला कायमचा ध़डा शिकविण्याच्या उद्देशाने पॉट्सडॅम जाहीरनाम्याद्वारे अमेरिका, ग्रेट ब्रिटन, व चीनने 26 जुलै 1945 रोजी जपानला बनशर्त शरण येण्याचे आवाहन केले व ट्रूमन यांनी ``तसे न झाल्यास जपानवर सर्वनाशक हल्ला होईल,’’ असा इशारा दिला. अकरा दिवसानंतरही जपानकडून काही उत्तर न आल्याने 6 ऑगस्ट 1945 रोजी हीरोशिमाच्या वेळेनुसार सकाळी 8.15 मिनिटांनी अमेरिकेने अणुबाँब (लिटल बॉय) टाकला व 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबाँबचा दुसरा हल्ला झाला. दोन्ही शहरे भुईसपाट झाल्यावर जपानी नेते शरण येण्यास तयार झाले.

अखेर जपान नरेश हिरोहितो यांनी 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागतीची घोषणा केली 2 सप्टेंबर 1945 रोजी जपानचे परराष्ट्र मंत्री मामोरू शिगेमित्सु यांनी यूएसएस मिसौरी या जहाजावर झालेल्या समारंभात जनरल रिचर्ड सदरलँड यांच्या व जपानी व अमेरिकन सेनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शऱणागतीच्या दस्तएवजावर स्वाक्षरी केली. दुसऱे महायुद्ध संपुष्टात आले, ते त्या दिवसापासून. दुसऱ्या महायुद्धात त्यावेळच्या (1940) 2.3 अब्ज लोकसंख्येपैकी 70 ते 85 दशलक्ष लोक ठार झाले व अनेक राष्ट्रांच्या संपत्तीची अतोनात हानी झाली. या व्यतिरिक्त रोगराई व अन्य कारणांनी अंदाजे 19 दशलक्ष ते 28 दशलक्ष लोक मरण पावले.

होनोलुलुतील पर्ल हार्बर संग्रहालय
भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी आलोय - तुर्कस्तानचे राजदूत फिरत सुनेल

पर्ल हार्बरच्या संग्रहालयात हल्ल्यातील सर्व घटनांचे वर्णन करणारे फलक असून त्यावर सर्व तपशीलवार माहिती वाचावयास मिळते. हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल, तर व्हर्चुअल उपकरणाद्वारे ते पाहाता येते. या शिवाय हल्ल्याबाबत एक सविस्तर चित्रपट पाहाता येतो. ओआहू बेटावरील कुलाऊ टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले पर्ल हार्बर, फोर्ड या छोट्या बेटानजिक असून, फोर्ट कामेहमेहा व फोर्ट वीव्हर या टेकड्यांच्या मधोमध असलेल्या चिंचोळ्या खाडीतून प्रशांत महासागराचा प्रवाह पर्ल बंदराच्या दिशेने जातो. ते नैसर्गिक बंदर आहे. टेकड्यांच्या परिसरात जपानी विमानांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी हल्ले केले. नौदलाने टेकड्यांवर पाच ठिकाणी रडार्स लावूनही त्यांना चुकवून ती पर्ल हार्बरला पोहोचली. ओपाना येथील फिरणाऱ्या रडारच्या दिशेने विमाने येत असल्याचे तेथील टेहाळणी अधिकाऱ्याने पाहिले देखील. परंतु, ती अमेरिकेचीच विमाने आहेत, असे वाटून त्याने काही कारवाई केली नाही.

1947 साली स्थापन झालेल्या अमेरिकेच्या लढाऊ इंडो-पॅसिफिक कमांडचे केंद्र होनोलुलुत असून, त्यात पावणेचार लाख अधिकारी, नौसैनिक काम करतात. `व्हॅलर, सॅक्रिफाईस अँड पीस’ हे बोधवाक्य असलेल्या कमांडचे नेतृत्व रिअर अडमिरल टिमॉथी कोट करीत असून, हिंद-प्रशांत महासागरात चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्याचे काम करीत आहे. या परिसरातील दक्षिण चीन समुद्रावर चीनने वर्चस्व स्थापित केले असून, अनेक ठिकाणी संरक्षणात्मक बांधकाम केले आहे. भारतासह प्रशांत महासागरातील अनेक देशांचा त्याला विरोध असून, महासागर ही `मानवाची सामईक संपत्ती’ असून, ``त्यावर सर्व राष्ट्रांचा समान अधिकार आहे,’’ असे चीनला वारंवार सांगितले जात आहे. पर्ल हार्बर येथे असलेल्या इंडो पॅसिफिक कमांडला अनन्य साधारण महत्व आहे. याचे कारण, कमांडच्या अधिकारक्षेत्राखाली प्रशांत महासागराचा 100 दशलक्ष चौरस मैलाचा परिसर येतो. या परिसराने पृथ्वीचा 52 टक्के भाग व्यापला आहे. त्यात अंटार्कटिका पासून चीन, मंगोलिया, दोन्ही कोरिया, जपान, दक्षिण पूर्व आशिया, हिंदी महासागर, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड, हवाई आदी 36 राष्ट्रांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com