पाकिस्तानचे 'गझनवी' भारतासाठी कितपत धोकादायक?

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा यामागे हेतू असल्याचे मानले जाते...

कराची : पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे.

गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा यामागे हेतू असल्याचे मानले जाते. मुळात पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहिली तर, त्यांना युद्ध परवडणारे नाही. पण, काश्मीरच्या मुद्द्यावरून तेथील सरकार आणि विरोधक दोघेही आक्रमक झाले आहेत. जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानात भारताविरुद्ध रोष वाढला आहे. परिणामी सीमेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढल्या आहेत. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरपासून गिलगिट संपूर्ण काश्मीर भारताचा हिस्सा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यातच पाकिस्तानने गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील मोठी शहरे येतात. 

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; गझनवी क्षेपणास्त्राची केली पुन्हा चाचणी

गझनवीची वैशिष्ट्ये 
- २९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र 
- गझनवी आकाराने मोठे असल्याने मोठे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता 
- स्वतःसाठी लागणारे इंधन व ऑक्सिजन बरोबर ठेवण्याची व्यवस्था 
- अणू युद्धासाठी याचा वापर केला जाऊ शकतो 
- गझनवीचे वजन ५ हजार २५६ किलो 
- क्षेपणास्त्राची उंची ९.६४ मीटर

शिळ्या कढीला ऊत 
पाकिस्तानात गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी पहिल्यांदा २६ मे २००२ रोजी करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करांमध्ये तणावाच्या काळात ही चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००३ रोजी गझनवीची पुन्हा यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यावेळी ही चाचणी खूप यशस्वी ठरल्याचे पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आले. त्यानंतर मार्च २००४मध्ये हे क्षेपणास्त्र पाकिस्तानी लष्कराच्या हातात देण्यात आले. त्यानंतर ८ डिसेंबर २२०४ रोजी या क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी करण्यात आली. पुढेही अशाचा चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ९ डिसेंबर २००६ १३ फेब्रुवारी २००८ आणि ८ मे २०१० रोजी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. पाकिस्तानातील विंटर प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत या चाचण्या करण्यात आल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. काल रात्री पुन्हा या क्षेपणास्त्राची नव्याने चाचणी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how many dangerous Ghazanavi to India