साठ लाख ज्यूंना ठार मारणाऱ्या आइशमनला इस्राईलने कसे पकडले?

Adlof Eichmann
Adlof EichmannSakal

कदाचित हिटलर वगळता इतर कोणालाही युरोपच्या यहुद्यांना मारण्याची तितकी उत्कटता नव्हती जितकी लेफ्टनंट कर्नल ऍडॉल्फ आइशमनला होती. दुसऱ्या महायुद्धात त्याने जवळपास साठ लाख ज्यूंना ठार मारल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या महायुद्धानंतर आइशमनचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी इस्राईलने अनेक प्रयत्न केले. मात्र तो अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहात होता, त्यामुळे त्याच्याबाबत काही खबरबात कोणाला नव्हती. मात्र इस्राईलच्या गुप्तचर संस्थेला आइशमन अर्जेंटिनामध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. त्याला पकडण्यासाठी एक पद्धतशीर मोहीम आखली. अर्जेंटिनामध्ये जाऊन आपल्या शत्रूला पकडणे सहजशक्‍य नव्हते. त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांचा छापा आणि मोठा आंतरराष्ट्रीय गोंधळ होऊ शकला असता. तरीही इस्राईलच्या गुप्तचर विभागातील काही पथकांनी आइशनमनला पकडण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांनी आखलेले प्लॅन एखाद्या सस्पेन्स चित्रपटापेक्षा कमी नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कित्येक वर्षे अर्जेंटिनामध्ये लपून बसले असताना, आइशमनने एक डच माणूस विलेम सैसेनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "खरं सांगू, जर आम्ही युरोपमध्ये राहणाऱ्या सर्व एक कोटी तीस लाख यहूद्यांना संपवले असते तर मी माझे काम पूर्ण केले असते. ते घडले नाही म्हणून मी माझ्या भावी पिढ्यांच्या समस्यांसाठी स्वतःला जबाबदार धरतो. आम्ही हे काम पूर्ण करू शकलो नाही; कारण आम्ही संख्येने कमी आहोत. पण आम्ही शक्‍य तितके केले.'

दुसरे महायुद्ध संपल्यावर, आइशमन कसा तरी अर्जेंटिनाला पळून जाण्यात यशस्वी झाला. 1957 मध्ये इस्राईलची गुप्तचर संस्था मोसादला त्यांच्या जर्मन स्रोतांकडून बातमी मिळाली, की आइशमन गेली अनेक वर्षे अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहात आहे. सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर मोसादचे संचालक इसेर हैरल पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियो यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना सांगितले, की आम्हाला अर्जेंटिनामध्ये आइशमन सापडला आहे. गुरियोने फर्मान सोडले की, "आम्हाला तो मृत किंवा जिवंत हवा आहे.' मग क्षणभर विचार केल्यानंतर म्हणाले, "तुम्ही त्याला शक्‍यतो जिवंत पकडा. आमच्या युवकांसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.'

रफी ऐतानला या मिशनचा कमांडर बनवण्यात आले

मोसाद गुप्तहेर संघ अर्जेंटिनाला पोचला. एप्रिल 1960 च्या अखेरीस, चार मोसाद हेरांची एक ऍडव्हान्स टीम वेगवेगळ्या दिशांनी अर्जेंटिनामध्ये दाखल झाली होती. त्यांनी ब्यूनस आयर्समध्ये एक घर भाड्याने घेतले ज्याला "कॅसिल' हे कोडनेम देण्यात आले. दरम्यान, इसेरला कळले की 20 मे रोजी अर्जेंटिना 150 वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. शिक्षणमंत्री अब्बा इबान यांच्या नेतृत्वाखाली इस्राईल अर्जेंटिनाला एक शिष्टमंडळही पाठवेल, असे ठरले. त्यांना घेऊन जाण्यासाठी इस्रायली एअरलाइन्स एलाइने "व्हिस्परिंग जायंट' हे विशेष विमान दिले.

इबानला थांगपत्ता लागू दिला नाही की या उदारतेचा मुख्य उद्देश "ऑपरेशन आइसमन' आहे. 11 मे रोजी एलईचे फ्लाईट क्रमांक 601 अर्जेंटिनाला उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैमानिकाला अतिशय काळजीपूर्वक निवडण्यात आले. पायलट ज्वी तोहारला त्याच्यासोबत मेकॅनिक घेऊन जाण्यास सांगण्यात आले; जेणेकरून अर्जेंटिनाच्या लॅंड क्रूच्या मदतीशिवाय त्याला अचानक उड्डाण करावे लागले तर त्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

"मिशन आइसमन' एका दिवसासाठी वाढवण्यात आले

10 मे रोजी आइशमन यांना त्यांच्या घराजवळून उचलण्याची योजना होती. 11 मे रोजी इस्रायली विमान तेथे पोचेल आणि 12 मे रोजी ते इस्राईलला रवाना होतील. पण शेवटच्या क्षणी ही योजना बिघडली. असे घडले की, अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातील अतिथींची वाढती संख्या लक्षात घेता अर्जेंटिनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रोटोकॉल विभागाने इस्रायली शिष्टमंडळाला कळवले, की त्यांना त्यांचे आगमन 19 मेपर्यंत पुढे ढकलणे आवश्‍यक आहे.

मोसादच्या कारनाम्यांवर "द ग्रेटेस्ट मिशन ऑफ द इस्रायली सिक्रेट सर्व्हिस मोसाद' या आपल्या पुस्तकात मायकेल बार जोहार आणि निसिम मिशाल यांनी लिहिले, की इसेर हैरेलसाठी याचा अर्थ एकतर आइशमनचे अपहरण 19 मेपर्यंत पुढे ढकलणे किंवा पूर्वनियोजित योजनेनुसार, त्याला 10 मे रोजीच उचलले पाहिजे आणि त्याला नऊ किंवा दहा दिवस कुठेतरी लपवून ठेवले पाहिजे. हा एक मोठा धोका होता आणि एक भीती होती, की आइशमनचे कुटुंबीय त्याचा शोध सुरू करू शकतात. परंतु असे असूनही, इसेरने योजनेनुसार पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 11 मे रोजी सायंकाळी 7.40 वाजता आयशमनला त्याच्या घराजवळून उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

आइशमन बस क्रमांक 203 मधून उतरला नाही

आइशमन दररोज संध्याकाळी 7.40 वाजता बस क्रमांक 203 ने घरी परतत असे आणि थोडे अंतर चालून आपल्या घरी पोचत असे. या कार्यात दोन कार सहभागी होतील अशी योजना होती. आइसमनला उचलण्यासाठी एजंट कारमध्ये उपस्थित राहतील. त्यांच्या सुरक्षेसाठी दुसरी कार तेथे असेल. 11 मे रोजी सायंकाळी 7.35 वाजता बसस्थानकाजवळ दोन कार उभ्या होत्या. पहिली कार काळ्या रंगाची शेवरले होती. दोन एजंट बाहेर आले आणि त्यांनी आपली कार बिघडल्यासारखे भासवू लागले. ज्वी अहारोनी ड्रायव्हिंग सीटवर बसले होते आणि चौथा एजंट कारच्या आत लपून आइशमन ज्या ठिकाणाहून चालत येणार होता त्या जागेवर नजर ठेवली होती. दुसरी काळ्या रंगाची ब्युक कार रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला थोड्या अंतरावर उभी होती. कारच्या बाहेर दोन एजंट उभे होते. तिसरी व्यक्ती ड्रायव्हर सीटवर होती. आइसमन दिसताच गाडीचे हेडलाईट लावून त्याचे डोळे दीपवून त्याला चकवणे हे त्याचे काम होते.

मायकेल बार जोहार आणि निसिम मिशाल म्हणतात, सायंकाळी 7.40 वाजता बस क्रमांक 203 थांबली, पण आइसमन त्यातून बाहेर आला नाही. संध्याकाळी 7.50 पर्यंत एकापाठोपाठ आणखी दोन बस आल्या पण आइशमन कुठेच सापडला नाही. एजंट्‌सची समस्या वाढतच गेली, की आइशननच्या सवयी अचानक बदलल्या का? किंवा त्याला योजनेचा सुगावा लागला का?

इसेरने आधीच टीमला कळवले होते की, जर आइशनमन रात्री आठ वाजेपर्यंत आला नाही तर मिशन सोडा आणि परत फिरा. पण रफी ऐतानने ठरवले की तो साडेआठ वाजेपर्यंत थांबेल.

आइशमनला जबरदस्तीने कारमध्ये बसवले

आठ वाजून पाच मिनिटांनी दुसरी बस येऊन थांबली. प्रथम त्यांनी कोणालाही बसमधून उतरताना पाहिले नाही. पण दुसऱ्या गाडीत बसलेल्या अवरूम शालोमला एक सावली येताना दिसली. त्याने ताबडतोब त्याच्या कारचे हेडलाइट्‌स चालू केले आणि येणाऱ्या व्यक्तीला जवळजवळ आंधळा करून टाकले. तेवढ्यात शेवरले कारचा मालक, एजंट ज्वी हा स्पॅनिशमध्ये ओरडला, "मोमेंतितो सेन्योर' (एक मिनिट, सर). आयशमनने खिशात हात घालून बॅटरी शोधण्याचा प्रयत्न केला.

मोसादवरील "राइज अँड किल फर्स्ट' या पुस्तकाचे लेखक रोनेन बर्गमन लिहितात की, "ज्वीला वाटले की आइशमन कदाचित त्याची पिस्तूल काढत आहे म्हणून त्याला मागून पकडून गाडीत आणण्याऐवजी ज्वीने त्याला ढकलले आणि त्याच्यावर बसला. आइशमन ओरडला पण तिथे त्याचा आवाज ऐकायला कोणी नव्हते. ज्वी अहारोनीने जर्मन भाषेमध्ये आइशमनला इशारा दिला, की "हलण्याचा प्रयत्न केलास गोळ्या घालण्यात येतील.' त्यांनी आइशमनला उचलून मागच्या सीटवर बसवले. गाडी पुढे सरकली आणि दुसरी गाडी त्याच्या मागे धावू लागली. चालत्या कारमध्ये एजंटांनी आइशमनचे हात-पाय बांधले आणि त्याच्या तोंडात कापड कोंबले.

अपेंडिक्‍स ऑपरेशनच्या निशाणीमुळे पटली ओळख

रोनेन बर्गमन लिहितात, "दरम्यान, ऐतानने अशा खुणा शोधायला सुरवात केली ज्याने शंकेचे निरसन होईल, की ज्या व्यक्तीला त्याने पकडले आहे ती इतर कोणी नसून आइशमन आहे. त्याच्या हाताखाली असलेला "एसएस' टॅटू लगेच ओळखला गेला. एसएस फाइल्समध्ये वर्णन केलेल्या त्याच्या पोटावरील अपेंडिक्‍स ऑपरेशनचा डाग शोधणे ही त्याला आता भेडसावणारी समस्या होती. हे पाहण्यासाठी, ऐतानने आइशमनचा बेल्ट उघडला आणि त्याच्या पॅंटमध्ये हात घातला. ते डागाचे चिन्ह दिसताच त्यांनी हिब्रू भाषेत ओरडले "जेह हू जेह हू' ज्याचा अर्थ - हा तोच आहे... हा तोच आहे...

अखेर आइशमनने त्याचे खरे नाव सांगितले

सकाळी 8.55 वाजता मोसादच्या हेरांच्या अड्ड्याच्या ड्राइव्ह वेवर दोन कार थांबल्या. आइशमनला घरात आणण्यात आले. जेव्हा एजंटांनी त्याचे कपडे काढायला सुरवात केली तेव्हा त्याने विरोध केला नाही. जर्मन भाषेतून त्यांनी आइशमनला तोंड उघडण्यास सांगितले. आइशमनने तेच केले. त्यांना पाहायचे होते की आइशमनने त्याच्या तोंडात विषारी कॅप्सूल तर लपवली नसेल ना. मग जर्मनीमध्ये आवाज घुमला, "तुमच्या शूज आणि टोपीचा आकार? जन्मतारीख? वडिलांचे नाव, आईचे नाव?'

आइशमनने रोबोटसारखं सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मग त्याने विचारले की, "तुमच्या नाझी पार्टीचा कार्ड नंबर काय आहे? आणि एसएसचा नंबर पण सांगा.' आइशमनने उत्तर दिलं, "45326 आणि 63752'. त्यांचा शेवटचा प्रश्न होता "तुमचे नाव?' आइशमनचे उत्तर होते "रिकार्डो क्‍लेमेंट.' मोसादच्या एजंटने पुन्हा विचारले "तुमचे नाव काय?' आइशमनने थरथरत उत्तर दिले, "ओटो हेनिंगर.' एजंटने पुन्हा तिसऱ्यांदा विचारले "तुमचे नाव?' या वेळी त्याचे उत्तर होते "ऍडॉल्फ आइशमन.'

इस्रायली विमान ब्यूनस आयर्सला पोचले

इस्रायली हेर आइशमनला ब्लेड देऊ शकले नाहीत. म्हणून त्यांनी स्वतःच आइशमनची दाढी केली. ते त्याला एका सेकंदासाठीही एकटे सोडू शकले नाहीत. जेव्हा तो शौचालयात जायचा तेव्हा मोसादचा एजंट त्याच्यासोबत असायचा. टीमचा सदस्य येहुदिथ निसियाहू याने आइशमनसाठी अन्न शिजवले पण त्याने उष्टे झालेले भांडे धुण्यास नकार दिला. पुढील दहा दिवस इस्रायली हेरांच्या आयुष्यातील सर्वात लांब दहा दिवस होते. ते त्यांच्या कैद्यासोबत परदेशात लपले होते.

त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांचा छापा आणि मोठा आंतरराष्ट्रीय गोंधळ होऊ शकला असता. इस्रायली विमानाने तेल अवीवच्या लॉड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 18 मे 1960 रोजी सकाळी 11 वाजता उड्डाण केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 मे रोजी विमान दुपारी ब्यूनस आयर्स विमानतळावर उतरले. दोन तासांनंतर इसेरने वैमानिक ज्वी तोहारशी बोलून 20 मे रोजी मध्यरात्री विमानाच्या उड्डाणाची वेळ निश्‍चित केली.

आइशमनला देण्यात आले विमानात इंजेक्‍शन

20 मेच्या रात्री 9 वाजता आइशमनला आंघोळ घालून इस्रायली एअरलाइन्स एलाईचा गणवेश घालण्यात आला. जीव जिकरोनीच्या नावाने त्याच्या खिशात खोटे ओळखपत्र ठेवण्यात आले. मायकेल बार जोहार आणि निसिम मिशाल लिहितात, "डॉक्‍टरांनी आइशमनला असे इंजेक्‍शन दिले की ज्यामुळे त्याला झोप तर आली नाही पण त्याला अंधुक दिसत होते. तो ऐकू शकत होता, पाहू शकत होता आणि चालूही शकत होता पण बोलू शकत नव्हता.'

"आइशमनला कारच्या मागच्या सीटवर बसवण्यात आले. त्याच वेळी ब्यूनस आयर्समधील एका प्रसिद्ध हॉटेलमधून आणखी दोन कार निघाल्या ज्यामध्ये मूळ इस्रायली एअरलाइन्स बसले होते. रात्री 11 वाजता सर्व कार एकत्र विमानतळावर दाखल झाल्या. कार बॅरिअर्सवर पोचताच, क्रूचे सदस्य "हाय इलाय' असे ओरडले. रक्षक त्याला ओळखत होते. त्यांनी कारच्या आत डोकावले. सर्वांनी इस्रायली एअरलाईन्सचा गणवेश घातला होता.'

"सर्व काही सामान्य आहे असे दाखवण्यासाठी काही क्रू गाणे गात होते, काही हसत होते तर काही मोठ्याने बोलत होते. गार्डने बॅरिअर उचललं आणि तिन्ही कार इस्रायली विमानाजवळ थांबल्या. आइशमनला अनेक विमानवाहकांनी वेढले होते. दोन माणसांनी त्याला पकडले आणि त्याला विमानावर आणले. आइशमनला प्रथम श्रेणीच्या खिडकीच्या सीटवर बसवण्यात आले. इस्रायली विमानाने तेल अवीवसाठी 11.15 वाजता उड्डाण केले.'

क्‍नेसेटमध्ये डेव्हिड बेन गुरियोची घोषणा

22 मे 1960 रोजी सकाळी तेल अवीवच्या लॉड विमानतळावर विमान उतरले. 9.50 वाजता मोसादचे संचालक इसेर हैरल जेरुसलेममध्ये पंतप्रधान डेव्हिड बेन गुरिया यांच्या कार्यालयात आले. त्यांचे सचिव इतजाक निवोन त्यांना थेट पंतप्रधानांच्या खोलीत घेऊन गेले. आश्‍चर्यचकित होऊन बेन गुरियाने त्याला विचारले, "तू कधी आलास?' इसेरने उत्तर दिले, "दोन तासांपूर्वी. आइशमन आमच्या ताब्यात आहे.' गुरियोने विचारले "कुठे आहे तो?' इसेरचे उत्तर होते, "इथे इस्राईलमध्येच. जर तुम्ही परवानगी दिली तर त्याला ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे.'

क्‍नेसेटमध्ये संध्याकाळी चार वाजता, इस्राईली संसद, डेव्हिड बेन गुरिया यांनी उभे राहून एक संक्षिप्त विधान केले, की "मला क्‍नेसेटला सांगायचे आहे, की इस्रायली सुरक्षा दलांनी सर्वांत मोठ्या नाझी गुन्हेगारांपैकी एक असलेल्या ऍडॉल्फ आइशमनला पकडले आहे, जो साठ लाख युरोपीय यहुद्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. तो सध्या इस्राईलच्या तुरुंगात आहे. लवकरच त्याच्यावर इस्रायली कायद्यानुसार खटला चालवला जाईल.'

डेव्हिड बेन गुरियो यांनी जसे हे वाक्‍य उच्चारले तेव्हा इस्रायली संसदेने टाळ्यांचा कडकडाट केला. आइशमनला 15 डिसेंबर 1961 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 31 मे 1962 रोजी त्याला फाशी देण्यात आली. इस्राईलच्या इतिहासातील ही पहिली आणि शेवटची फाशी होती.

आइशमनचे शेवटचे शब्द होते, "आम्ही पुन्हा भेटू. मी देवावर विश्वास ठेवून जगलो. मी युद्धाच्या नियमांचे पालन केले आणि नेहमीच माझ्या ध्वजावर विश्वासू राहिलो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com