रशियात मायनस 50 डिग्री तापमानात आंदोलनाचा 'भडका'; पोलिसांवर बर्फाचे गोळे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

रशियात पुतिन सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

मॉस्को : रशियात पुतिन सरकारच्या विरोधात -50 डिग्री तापमान असताना देखील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसक झटापट देखील घडली. रशियातील अनेक शहरांमध्ये आंदोलनादरम्यान शनिवारी 3,100 हून अधिक आंदोलकांना अटक केली गेली आहे. पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेल्या एलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेसाठी तसेच पुतिन यांचं सरकार हटवण्याच्या मागणीसाठी रशियाच्या अनेक शहरामध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. नवाल्नी यांनी बर्लिनहून आल्यावर मॉस्को एअरपोर्टवर  17 जानेवारीला अटक करण्यात आली होती.

आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या दडपशाहीचा अमेरिका आणि ब्रुसेल्सने निषेध नोंदवला आहे. युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरोल यांनी म्हटलं की, संघ पुढच्या वाटचालीबाबत सोमवारी चर्चा करेल. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे सर्वांत मोठे टीकाकार तसेच विरोधक नवाल्नी यांना 17 जानेवारी रोजी अटक केली गेली होती. ते जर्मनीहून मॉस्कोला परतले होते. जर्मनीमध्ये पाच महिने त्यांच्यावर उपचार सुरु होता. आपल्यावर विषप्रयोग केला गेल्याचा आरोप त्यांनी रशिया सरकारवर केला होता. 

हेही वाचा - कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी उकळले अधिक पैसे; हिंदू पुजाऱ्यांवर दक्षिण अफ्रिकेत आरोप

त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सुरु असलेलं आंदोलन काल शनिवारी आणखी व्यापक झालं. रशियाच्या 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलन झालं. राजधानी मॉस्कोमध्ये आंदोलकांनी पुश्किन स्क्वायरला घेरा घातला तसेच पोलिसांवर स्नोबॉलचा हल्ला देखी केला. याला प्रत्युत्तर म्हणून  पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार करत मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतलं आहे. 

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक ऍलेक्सी नवाल्नी यांना नाट्यमय घडामोडी होऊन रविवारी सायंकाळी मॉस्कोत अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराविरुद्ध वेळोवेळी आवाज उठविणाऱ्या, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात यशस्वी ठरलेल्या नवाल्नी यांचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने गेल्या ऑगस्टमध्ये विमानात त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याची आरोप त्यांनी केला होता. जर्मनीत वेळीच उपचार मिळाल्याने सावरलेल्या नवाल्नी यांनी पुतीन यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याचा निर्धार व्यक्त करताच त्यांच्या अटकेची जय्यत तयारी करण्यात आली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge protest in russia in support of alexei navalny