कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी उकळले अधिक पैसे; हिंदू पुजाऱ्यांवर दक्षिण अफ्रिकेत आरोप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

दक्षिण अफ्रिकेमध्ये काही हिंदू पुजाऱ्यांवर आरोप लावण्यात आले आहेत.

डरबन : दक्षिण अफ्रिकेमध्ये काही हिंदू पुजाऱ्यांवर आरोप लावण्यात आले आहेत. कोरोनामुळे मरणाऱ्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांनी अधिक पैसे उकळले असल्याचा हा आरोप आहे. डरबनमध्ये क्लेअर एस्टेट क्रिमेटोरियमचे प्रमुख प्रदीप रामलाल यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. दक्षिण अफ्रिकामध्ये हिंदू धर्म असोसिएशनचे सदस्य रामलाल यांनी म्हटलं की, त्यांना अनेक परिवारांकडून अंत्यसंस्कारासाठी पुजाऱ्यांकडून अधिक पैसे वसूल केले गेल्याची तक्रार मिळाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अनेक कुटुंबियांनी ही तक्रार नोंदवली आहे. 

हेही वाचा - VIDEO - बछड्याच्या मृत्यूनंतर सिंहिणीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

अलिकडेच दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संक्रमणाचा हाहाकार पहायला मिळाला. तेंव्हा मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी म्हणून कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करत होते. दक्षिण अफ्रिकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची लोकसंख्या जवळपास 14 लाख आहे. रामलाल यांनी यांसदर्भात विकली पोस्टशी बोलताना म्हटलं की, पुजारी अंत्यसंस्कारासाठी अधिक शुल्क वसूल करत आहेत, ही गोष्ट बरोबर नाही. आपल्या धर्मग्रंथानुसार ही समुदायाची सेवा आहे. जर एखादा परिवार पुजाऱ्यांना दान देऊ इच्छित असेल तर ते ठिक आहे मात्र पुजाऱ्यांनी यासाठी अधिक शुल्क वसुलणे योग्य नाही.

त्यांनी समुदायाला म्हटलं की, आज परिस्थिती प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत या प्रकारच्या शोषणाला बळी पडू नका. अंत्यसंस्कार स्वत:च करा. यासाठी आधीपासून रेकॉर्डेड व्हिडीओची मदत आपण घेऊ शकता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दक्षिण अफ्रिकामध्ये कोविड-19 च्या संक्रमणात वाढ झाली आहे. तसेच यामुळे मृतांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आतापर्यंत कोरोना संक्रमणाचे 13 लाखाहून अधिक केसेस समोर आल्या आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 39,501 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत पुढील महिन्यापर्यंत दक्षिण अफ्रिकेमध्ये कोरोना लसीचे 1.5 हून अधिक खुराक पाठवणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south africa hindu priests more money for funeral in coronavirus death case