मानवामुळे पन्नास वर्षांत वन्यजीवांच्या संख्येत दोन तृतीयांशपेक्षाही अधिक घट

Wild-Animal
Wild-Animal

लंडन - माणसाची हाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम निसर्गसृष्टीवर होताना दिसतात, बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवासच संपुष्टात येऊ लागला असून, याचा विपरीत परिणाम त्यांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे. मागील पन्नास वर्षांच्या काळामध्ये वन्यप्राण्यांची संख्या दोनतृतीयांशाने घटल्याचे वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ही विनाशकारी घट काही केल्या थांबण्याची चिन्हे नसून निसर्गाच्या विध्वंसाचा हा वेग याआधी कधीही एवढा प्रचंड नव्हता, असे या संघटनेचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वच प्रजातींना धोका
या अहवालाच्या निर्मितीपूर्वी शास्त्रज्ञांनी जगभरातील हजारो प्राण्यांच्या प्रजातींच्या अधिवासाचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता. जगात सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरीसृप आणि माशांच्या वीस हजारांपेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात. मागील १९७० पासूनचा काळ लक्षात घेतला तर त्यांच्या संख्येमध्ये सरासरी ६८ टक्क्यांची घट  झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मानव आणि निसर्ग कसे एकमेकांशी संबंधित आहेत हे पुन्हा एकदा उघड झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. वन्यप्राण्यांची बेकायदा तस्करी आणि त्यांचा अधिवास संपुष्टात येणे याचा संबंध त्यांनी कोरोनाच्या संसर्गाशी जोडला आहे. वन्य संपदेची हानी रोखण्यासाठी संशोधकांनी एक वेगळे मॉडेल तयार केले असून त्यामध्ये त्यांनी हे नुकसान भरून काढणे शक्य असल्याचे म्हटले आहे पण त्यासाठी वेगाने पावले उचलावी लागतील.

प्रमुख कारणे
वाढती लोकसंख्या, बेसुमार जंगलतोड, नैसर्गिक साधनसंपत्तीची अमर्याद लूट, वातावरणातील बदल

हे बदल आवश्यक
अन्न निर्मिती आणि उपभोगाचा पॅटर्न बदलावा लागेल, ऊर्जा निर्मिती, व्यवस्थापनाच्या तंत्रात आमूलाग्र बदल करणे आवश्‍यक आहे.  सागरी साधन संपत्तीचे संवर्धन आणि संरक्षणाबरोबरच कृषी क्षेत्रातील पुरवठा साखळीचा पुनर्विचार हवा. ग्राहक म्हणूनही लोकांना त्यांची जबाबदारी ओळखावी लागेल

बदलावेच लागणार
जगातील उष्ण कटिबंधीय वने मोठ्याप्रमाणावर घटली आहेत, लॅटिन अमेरिका आणि भूमध्य सागराच्या परिसरात ही घट तब्बल ९४ टक्क्यांची आहे. वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्याने विविध प्राण्यांच्या प्रजाती वेगाने संपुष्टात येऊ लागल्या आहेत. याला कोठेतरी ब्रेक लावणे गरजेचे आहे. असे संशोधकांचे म्हणणे आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचरने प्राण्यांच्या विविध प्रजातींवर या बदलांचे नेमके कशा पद्धतीने आघात होत आहेत याचे मूल्यमापन केले आहे. आफ्रिका खंडातील गोरिला आणि घानातील करड्या रंगाचा पोपट यांनाही या बदलांचा जबरदस्त फटका बसला आहे.

१ लाख - प्राणी, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास
३२ हजार - प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
६० टक्के - २०१६ मधील घट
७० टक्के - आताची घट

कोरोना आणि ईबोलासारखे घातक विषाणू मानवापासून दूर ठेवण्याचे काम या जंगलांनी केले होते. पण, आता त्यांना अडथळा निर्माण करणारी जंगलेच संपुष्टात आल्याने मानवाचे यापासून संरक्षण होणे कठीण झाले आहे. 
- फ्रॅंक प्राईस, वन्यसंशोधक

जंगलांना आगी लावल्या जात असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व झपाट्याने धोक्यात येऊ लागले आहे. समुद्रातील मासे देखील संपुष्टात येऊ लागले असून, अनेक वृक्षांच्या प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आपणच जगाला संकटात आणत आहोत. मानवी आरोग्य, या ग्रहावर टिकाव धरण्याची क्षमता आणि सुरक्षितता यांना नख लावण्याचे काम सध्या सुरू आहे. निसर्गाने आपल्याला इशारा द्यायला सुरुवात केली असून, आपल्या हातून वेळ मात्र निघून जाते आहे.
- तान्या स्टेले, कार्यकारी प्रमुख डब्ल्यूडब्ल्यूएफ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com