Living on the Moon : मानव लवकरच चांद्रवासी होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Living On The Moon

Living On The Moon : मानव लवकरच चांद्रवासी होणार!

लंडन : चंद्रावर वास्तव्य करण्याचे मानवाचे स्पप्न या दशकात पूर्ण होण्‍याची शक्यता आहे. ‘स्पेस एक्स’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क हेच नाही तर आता अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ही त्याबाबत सकारात्मक आहे.

चंद्रावर जमीन खरेदीची चर्चा आपण वर्षानुवर्षे ऐकत असतो. जमीन खरेदी केल्यानंतर काहीजण त्याबाबतचे प्रमाणही सोशल मीडियावर शेअर करीत असतात. चंद्रावर जमीन खरेदीची चेष्टाच जास्त होत असते. पृथ्वीच्या कक्षेबाहेर असलेल्या या उपग्रहावर ज्यांनी खरोखर जमीन विकत घेतली आहे, त्यांनाही तेथे जाऊन राहता येणार का, याची कल्पना नाही.

पण आता ही परीकल्पना सत्यात उतरणार असल्याचा दिलासा मिळू लागला आहे. ‘नासा’च्या ओरायन चांद्रयान कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी ‘बीबीसी’शी बोलता मानव दीर्घकाळ चंद्रावर राहू शकेल, असा सकारात्मक विचार मांडला आहे. ते म्हणाले, ‘‘अंतराळातील अति खोल वातावरणात कसे राहता येईल, याची चाचपणी करण्‍यासाठी अर्टिमिस मोहीम आमच्यासाठी एक शाश्‍वत व्यासपीठ आणि प्रवासाची निश्‍चित दिशा देणारी आहे. आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला पाठविणार असून ते तिथे राहून विज्ञानाचे प्रयोग करतील.’’

मगच मंगळावर मोठे पाऊल टाकता येईल!

चंद्रावर मानवी वस्तीच्या प्रयोगासंबंधी रविवारी (ता.२०) प्रसिद्ध झालेल्या अहवालात नासाच्या ओरायन चांद्रयान कार्यक्रमाचे प्रमुख हू यांची मते नमूद केली आहेत. पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडील थोडेफार जाणून घेणे आपल्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचे आहे. मगच मंगळावर गेल्यावर मोठे पाऊल टाकता येईल, असेही ते म्हणाले.

आपण पुन्हा चंद्रावर जात आहोत. आम्ही शाश्‍वत प्रकल्पावर काम करीत आहोत. याच यानातून लोक चंद्रावर पुन्हा उतरतील. केवळ अमेरिका नाही तर संपूर्ण जगाच्यादृष्टिने दीर्घकालीन सखोल अंतराळ संशोधनासाठी आम्ही उचललेले हे पहिले मोठे पाऊल आहे.

- हॉवर्ड हू, प्रमुख, ओरायन चांद्रयान कार्यक्रम, नासा

टॅग्स :moonElon MuskNASA