कमला हॅरिस यांच्यापेक्षा भारतीयांचं माझ्यावर जास्त प्रेम- डोनाल्ड ट्रम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 15 August 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन आणि उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. जो बायडेन यांच्या सरकारमध्ये अमेरिकेमध्ये कोणीही सुरक्षित राहणार नाही, असं ते म्हणाले आहेत. शिवाय कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांच्यावरही ट्रम्प यांनी टीका केली. कमला हॅरिस यांच्यामागे भारत असण्याचा वारसा आहे. मात्र, त्यांच्यापेक्षा जास्त भारतीयांचा मला पाठिंबा असल्याचं ते म्हणाले आहेत. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'जय श्रीराम'!

जो बायडेन राष्ट्रपती झाले तर ते तात्काळ कायदा पारित करुन अमेरिकेतील पोलिस विभागाचे अधिकार कमी करतील. कमला हॅरिस तर त्यांच्यापेक्षा पुढचे पाऊल उचलू शकतात. कमला हॅरिस या पोलिस यंत्रणेच्या विरोधात आहेत. डेमोक्रॅटिकची सत्ता आल्यास बायडेन आणि कमला हॅरिस पोलिसांविरोधात लेफ्ट-विंग युद्ध सुरु करतील, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ते न्यूयॉर्कमध्ये पोलिस संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

बायडेन तुमच्याकडून प्रतिष्ठा आणि आदर हिसकावून घेऊ पाहात आहेत. त्यांचे सरकार आले तर अमेरिकेत कोणीही सुरक्षित राहणार नाही, असं ट्रम्प म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यावर पोलिसांची बदनामी करत असल्याचा आरोप करत आहेत. शिवाय कमला हॅरिस सर्वात भीतीदायक सिनेटर असल्याची टीका त्यांनी केली होती

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकासंबंधी होणाऱ्या अनेक सर्वेक्षणांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी होताना दिसत आहे. त्यामुळे ट्रम्प यांची टीकेची धार वाढली आहे.  बायडेन सत्तेवर आले तर अमेरिकेचे फार मोठे नुकसान होईल. अमेरिका दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. तसेच बायडेन सत्तेत आल्यास जगभरात अमेरिकेची थट्टा केली जाईल, असं ट्रम्प म्हणाले होते. 

PM मोदींकडून राष्ट्रीय आरोग्य मिशनची घोषणा; जाणून घ्या नेमका काय आहे उपक्रम

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन मैदानात आहे. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी आहे. मात्र यावेळी त्यांचा मार्ग खडतर असल्याचं दिसत आहे. कोरोना महामारी आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण तयार झालं आहे. दुसरेकडे जो बायडेन यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अमेरिकेतील निकालांकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I have more Indians than kamla haris has said donald trump us election