प्रेषित महंमदांच्या व्यंगचित्राचा निषेध करणार नाही; फ्रान्सच्या अध्यक्षांचं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

फ्रान्समधील व्यंगचित्रात्मक नियतकालिक शार्ली हेब्दोने प्रेषित महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध केले आहे

पॅरिस- फ्रान्समधील व्यंगचित्रात्मक नियतकालिक शार्ली हेब्दोने प्रेषित महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध केले आहे. या नियतकालिकाने २०१५ मध्ये पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. यात पेंगबरांच्या डोक्लाला बॉम्ब बांधल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावरून कट्टर इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात या व्यंगचित्रकारासह ‘शार्ली हेब्दो’चे १२ कर्मचारी मारले गेले होते. तसेच तीन दहशतवादीही ठार झाले होते. 

कॅबिनेटचा मोठा निर्णय; आता सरकारी अधिकारी बनणार 'कर्मयोगी'!

या हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर दहशतवाद्यांनी एका सुपर मार्केटवरही हल्ला केला होता. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. या घटनेत एक महिला व दोन दहशतवाद्यांसह १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी न्यायालयात बुधवारपासून सुनावणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शार्ली हेब्दोने पुन्हा एकदा प्रेषित महंमद पैगंबरांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.

दोषींविरोधात जनमत तयार होण्यासाठी ‘शार्ली हेब्दो’ने व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नवीन अंकात अनेक व्यंगचित्र प्रसिद्ध केली आहेत. त्यात प्रेषित महंमद पैगंबर यांचेही वादग्रस्त चित्र आहे. या व्यंगचित्राला ‘हे सर्व फक्त त्याच्यासाठी’ असे शीर्षकही दिले आहे.

नियतकालिकाचे संपादक लॉरेंट रिस सौरियू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इतिहास पुन्हा लिहिला जाऊ शकत नाही आणि पुसलाही जाऊ शकत नाही. आधीच्या संपादकीयमध्ये त्यांनी महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र पुन्हा न छापण्याचा निर्णय घेतला होता. पण या प्रकरणाची सुनावणी सुरू होत असल्याने वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध करण्याचे ठरविण्यात आल्याचे म्हटले आहे. 

IPS अधिकाऱ्याच्या अफेअर्समुळे पत्नी परेशान; थेट अमित शहांनाच लिहिलं पत्र

महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र सर्वांत आधी डेन्मार्कमधील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. त्या वेळीही जगभरात हिंसक आंदोलने झाली होती. त्यानंतर एका वर्षभराने ‘शार्ली हेब्दो’ने व्यंगचित्र त्यांच्या अंकात छापले. त्यामुळे मुस्लीम जगतात मोठा संताप उमटला होता. ‘शार्ली हेब्दो’ला अनेक धमक्याही येत होत्या. त्यातच दोन भावांनी नियतकालिकाच्या कार्यालयात येऊन बेछूट गोळीबार केला. यात १२ कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. मुस्लीम समाजात प्रेषित महंमद पैगंबर यांना कोणत्याही दृष्य स्वरुपात दाखवणे निषिध आहे.

फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, नियतकालिक शार्ली हेब्दोने प्रेषित महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र पुन्हा प्रसिद्ध केल्याचा मी निषेध करणार नाही. फ्रान्समध्ये सर्वांना आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फ्रान्सच्या प्रत्येक नागरिकाने एकमेकांप्रती आदर राखावा आणि द्वेषाचा संवाद टाळावा. देशातील पत्रकाराला किंवा एका न्यूज संस्थेला काय छापावे आणि काय नाही, हे मी सांगू शकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Would not Condemn Cartoons Of Prophet Mohammad said French President Emmanuel Macron