कोरोना, ब्रुसेलोसिस आणि आता कॅट क्यू व्हायरस? नव्या विषाणूबद्दल आयसीएमआरची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

कोरोना महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे.

कोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आजही दिवसाला एक लाखाच्या आसपास रुग्ण देशात सापडत आहेत. या महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे.

काय आहे विषाणू?
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या संशोधकांना या नव्या विषाणूचा शोध लागला आहे. या विषाणूचे नाव कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असे आहे. हा विषाणू सुद्धा येत्या काळात धुडगूस घालू शकतो असा अंदाज आयसीएमआरने व्यक्त केला आहे. अ‍ॅन्थ्रोपॉड प्रकारच्या या विषाणूचा डास अथवा डुक्कर यांच्या माध्यमातून संसर्ग होऊ शकतो. चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये हा नवा विषाणू मोठ्या  प्रमाणावर आढळून आला आहे. या नव्या विषाणूच्या संशोधनाचं वृत्त लाईव्ह मिंटने दिलं आहे. .

भारतातील अवस्था काय?
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि आयसीएमआरच्या संशोधकांनी यावर  संशोधन केले आहे. 883 नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये या कॅट क्यू व्हायरसच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. या दोन्ही रुग्णांना यापूर्वी कधी ना कधी या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असणार हे या अँटीबॉडीजवरून स्पष्ट होत आहे. 2014 आणि 2017 या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरात या विषाणूच्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. 

काय सांगतं संशोधन?
या दोन्ही रुग्णांना डुक्कर अथवा जंगलातील पक्षांच्या माध्यमातून या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता ही आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असल्याचं वृत्त लाईव्ह मिंटने दिलेलं आहे. माणसाच्या शरीरात सापडलेल्या अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आणि डासांच्या शरीरात आढळलेल्या सीक्यूव्ही या विषाणूंमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. ज्या डासांद्वारे हा संसर्ग होतो त्यांचीही चाचणी सध्या सुरु आहे. भारतातील डासांवर याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास संशोधक करत आहेत. डासांबरोबरच पक्षांद्वारेही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. चीनमध्ये पाळलेल्या डूकरांमध्ये हा विषाणू आढळलेला आहे. 

याआधी ब्रुसेलोसिसचे थैमान 
याआधी ब्रुसेलोसिस (brucellosis) नावाचा नवा आजार चीनमध्ये थैमान घालत असल्याची माहिती समोर आली होती. चीनच्या वायव्य भागात या रोगाची अनेकांना बाधा होऊन या विषाणूमुळे होणाऱ्या रोगाचे हजारो रुग्ण आढळून आल्याची माहिती होती. ही बातमी ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने समोर आणली होती. गान्सू या प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या रोगाचे 3,235 रुग्ण आढळून आले आहेत. 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्ट यादरम्यान एका औषधनिर्मिती करणाऱ्या एका कारखान्यामध्ये लस निर्माण करण्याचे काम केले जात होते. या प्रक्रियेतूनच हा विषाणू  पसरला असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICMR gives info about cat que virus china corona new virus