कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या 29 औषधांची ओळख; भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश

टीम ई-सकाळ
Monday, 15 June 2020

प्राथमिक अभ्यासाच्या आधारे 20 अशा औषधांची ओळख करण्यात आली आहे, जे लोकांना परिचित आहेत आणि त्यांचा वापर कोरोना विषाणूच्या विरोधात केला जाऊ शकतो.

बंगळुरु: गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साईन्सच्या शास्त्रज्ञांनी 29 अशा औषधांची ओळख केली आहे, ज्यांचा वापर कोरोनोबाधित रुग्णांच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. आयआयएससीने जीनोमिक्सच्या अभ्यासाच्या आधारावार 29 प्रभावी औषधांची ओळख केली आहे. आयआयएससीचे प्रोफेसर नारायणस्वामी श्रीनिवासन, सोहिनी चक्रबर्ती आणि स्नेहा भीमीरेड्डी यांच्या गटाने या औषधांची ओळख केली आहे. त्यांनी यासंबंधी एक शोध पेपर तयार केला आहे. प्राथमिक अभ्यासाच्या आधारे 20 अशा औषधांची ओळख करण्यात आली आहे, जे लोकांना परिचित आहेत आणि त्यांचा वापर कोरोना विषाणूच्या विरोधात केला जाऊ शकतो. यासोबत 9 इन्वेस्टिगेशनल ड्रग मॉलिक्यूल्सची ओळख करण्यात आली आहे, अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे.

कोरोना वॅक्सिनसंदर्भात चिनी कंपनीने दिली गूड न्यूज!

अभ्यासातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यांच्यावर आणखी संशोधन करणे बाकी आहे. आमच्या अभ्यासातून जे तथ्य समोर आले आहेत, त्यांच्यावर आम्ही आणखी काम करत आहोत. आमच्या संशोधनातून बायोटेक्नॉलजिस्ट आणि बायोमेडिकल संशोधक यांना मदत मिळावी असा आमचा हेतू असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. आमच्या संशोधनाचा वापर सध्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी करता येणार नाही. कारण यावर आणखी खूप संशोधन व्हायला हवं. त्यामुळे याचा वापर फक्त संशोधकांनी करावा. फक्त प्राथमिक अभ्यासाच्या आधारावर याचा वापर करणे योग्य ठरणार नाही, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक साथीमुळे आरोग्याचे मोठे संकट

दरम्यान, जगासह देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 11, 502 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 325 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या पुढे नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 32 हजार 424 इतकी झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भारताचा जगात चौथा क्रमांक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identification of 29 drugs that are effective on corona; Great success for Indian scientists