पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा मोदींना फोन

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.

इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करतील, अशी इच्छा खान यांनी यावेळी व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोदी म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत गरिबीविरुद्ध लढण्यासाठी तयार आहोत, परंतु शांती आणि विकासासाठी पहिल्यांदा दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण तयार करणे आवश्यक आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक पाकिस्तानच्या विदेशी मंत्रालयाने जारी केले आहे. यामध्ये मोदींसोबत काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये पहिल्यांदाच फोनवर चर्चा झाली आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. ते म्हणाले, दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan Dials PM Modi, Congratulates Him On Election Victory