चीनला झटका देत संयुक्त राष्ट्रात भारताने मारली बाजी; 'ECOSOC'चं मिळवलं सदस्यत्व

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 15 September 2020

प्रतिष्ठित अशा ECOSOC मध्ये भारताला जागा मिळवण्यात यश मिळालं आहे.

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रामध्ये चीनला मोठा झटका बसला आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषदेची Economic and Social Council (ECOSOC) संस्था असलेल्या 'युनायटेड नेशन्स कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन' च्या सदस्यपदी भारताची वर्णी लागली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. या ECOSOC चे सदस्यत्व भारताकडे चार वर्षांसाठी असणार आहे. 

तिरुमूर्ती यांनी यासंबंधी ट्विट केलं. प्रतिष्ठित अशा ECOSOC मध्ये भारताला जागा मिळवण्यात यश मिळालं आहे. भारत 'कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन'मध्ये Commission on Status of Women (CSW) सदस्यत्व मिळवू शकला आहे. लिंग समानता आणि महिला सबलीकरण हे कायमच भारताच्या अजेंड्यावर राहिलं आहे. आम्हाला पाठिंबा दिलेल्या सर्व सदस्य देशांचे आम्ही आभार मानतो, असं तिरुमूर्ती म्हणाले आहेत. 

कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमनच्या सदस्यत्वासाठी भारत, अफगाणिस्तान आणि चीन यांच्यात स्पर्धा होती. या तिघांनी CSW चे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, भारताने चीनला जोरदार झटका देत या संस्थेत आपल्याला सदस्यत्व मिळवले आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचा ५४ सदस्यांची मतं मिळून विजय झाला, तर चीनला अर्धी मतंही मिळू शकली नाहीत. विशेष म्हणजे यावर्षी प्रसिद्ध बिजिंग वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वूमनचा २५ वा वर्धापनदिन आहे. त्यामुळे चीनसाठी हा मोठा धक्का मानता जात आहे. 

भारत 'युटायटेड नेशन्स कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन'चा चार वर्षासाठी सदस्य असणार आहे. २०२१ ते २०२५ या दरम्यान भारत या संस्थेचा सदस्य असेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Beats China Becomes Member Of UN Economic And Social Council Body