अभिमानास्पद! यूएनमध्ये महत्वाच्या समितीवर भारतीयाची नियुक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 7 November 2020

संयुक्त राष्ट्राच्या एका महत्वाच्या समितीमध्ये भारतीयाची निवड झाली आहे.

न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्राच्या एका महत्वाच्या समितीमध्ये भारतीयाची निवड झाली आहे. विदिशा मैत्रा यांची प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्न  Administrative and Budgetary Questions (ACABQ) समितीमध्ये सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. जगाच्या आर्थिक बाबी सांभाळणाऱ्या समितीमध्ये मैत्रा यांची निवड होणे भारतासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातंय. 

आशिया पॅसिफिक गटातून निवडले गेलेल्या मैत्रा एकमेव उमेदवार आहेत. 126 मतांपैकी 64 मत त्यांना मिळाली होती. भारत या समितीचा 1946 पासून सदस्य आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये ACABQ समिती महत्वाची भूमिका बजावत आली आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली पुढील वर्षी यूएन सुरक्षा परिषदेचा तात्पुरत्या सदस्यपदासाठी प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने ही निवड महत्वाची आहे. 

मागील आठ वर्षांत देशभरातून तब्बल 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड्स रद्द

ACABQ अनेक महत्वाचे कार्य पार पाडत असते. यूएन सचिव प्रमुख जनरल असेंब्लीसमोर अर्थसंकल्प सादर करत असतात. याची पडताळणी करण्याचे काम ACABQ समितीकडे असते. शिवाय जनरल असेंब्लीला प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय मुद्द्यावरुन सल्ला देण्याचे कामही समिती करत असते. सदस्य राष्ट्रांची संसाधने योग्यपणे वापरली जात आहेत ना, हे पाहण्याचे काम समितीचे आहे. शिवाय निधीचा योग्यरित्या वापर केला जातोय का, याकडेही समिती लक्ष ठेवून असते. 

ACABQ सदस्याची निवड 193 सदस्य राष्ट्रांकडून जनरल असेंब्लीमध्ये करण्यात येते. यावेळी सदस्याचा अनुभव, पात्रता पाहिली जाते, त्यानंतर 3 वर्षासाठी त्याची नियुक्ती केली जाते. ACABQ सदस्य हा एखाद्या राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून काम करत नाहीत, तर स्वतंत्ररित्या काम करतो. समितीमध्ये निवड होण्यापूर्वी मैत्रा यांनी नवी दिल्लीत अनेक महत्वांच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात, इंडिया मिशन टू पॅरिस, पोर्ट लुईस आणि न्यूयॉर्कमध्ये गेल्या 11 वर्षांत काम केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India candidate elected to key UN committee Vidisha Maitra