
नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनमधून आणण्याची प्रक्रिया
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बेपत्ता झालेला भारतीय तरुण चीनी सैनिकांना सापडला असून त्याला परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लष्करातर्फे आज सांगण्यात आले. मागील आठवड्यात चीनी सैनिकांनी त्याचे अपहरण केल्याच्या आरोपांवरून वाद निर्माण झाला होता.
अरुणाचलचा रहिवासी असलेला मिराम तारोन या सतरा वर्षीय तरुणाचे चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीतून अपहरण केले असल्याचा आरोप अरुणाचलचे भाजप खासदार तापीर गाओ यांनी केला होता. तसेच यामध्ये केंद्राने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही केली होती.
हेही वाचा: राज्यभरात परीक्षा सुरळीत; लोकसेवा आयोगाचा दावा
यानंतर भारतीय लष्करातर्फे चीनी लष्कराला याबाबत हॉटलाईनद्वारे कळविण्यात आले होते. वनौषधी शोधण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाल्याने त्याला शोधण्यासाठी सहकार्य देखील मागितले होते.
या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तेजपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले की, भारतीय तरुण सापडल्याचे चीनी लष्कराने कळविले असून त्याला परत आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राहुल यांची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मिराम तारोन प्रकरणावरून पुन्हा केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘सरकारमध्ये आहात तर कर्तव्याचे पालन करा आणि मिराम तारोनला तातडीने परत आणा,‘ असे ट्विट त्यांनी केले. प्रजासत्ताकदिनाच्या आधी भारताच्या एका भाग्यविधात्याचे चीनने अपहरण केले असल्याचे राहुल यांनी म्हटले होते. तसेच पंतप्रधानांचे भयभीत मौन हेच त्यांचे वक्तव्य असून त्यांना अशा गोष्टींचा काहीही फरक पडत नाही, असाही टोला लगावला होता.
Web Title: India China Border Missing Young Guy Return Process
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..