भारताच्या आघाडीमुळे खवळला चीन, तिबेटमध्ये युद्धसराव करत डागली मिसाईल

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असताना पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाख जवळच्या भागात रात्री युद्धाभ्यास केला आहे.

बिजिंग- भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु असताना पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाख जवळच्या भागात रात्री युद्धाभ्यास केला आहे. चीनने युद्धाभ्यासादरम्यान तोफा चालवल्या, तसेच जमीनवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलचे परीक्षणही घेतले. चिनी सैन्याच्या एअर डिफेंस सिस्टिमने शत्रूंच्या लढाऊ विमानांना पाडण्याचाही अभ्यास केला. 

चीन सरकारच्या ग्लोबल टाईम्स वृत्तसंस्थेने यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिबेटमधील सैन्य कमांडच्या चिनी सैनिकांनी रविवारी रात्री व्यापकस्तरावर युद्धअभ्यास केला. हा अभ्यास समुद्र सपाटीपासून ४५०० मीटर उंचीवर करण्यात आला आहे. याच दरम्यान, चिनी सैन्याने जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाईल, रॉकेट आणि तोफांची चाचणी घेतली. एअर डिफेंस सिस्टिमने लढाऊ विमाना पाडण्याचा अभ्यास केला. 

विशेष म्हणजे भारताचे शक्तिशाली राफेल लढाऊ विमाने लडाखच्या भागात उड्डाण भरत आहेत, याच वेळी चीनने हा युद्धाभ्यास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राफेलच्या वैमानिकांनी अंबाला ते लडाखपर्यंत विमान उडवले होते. सरावासाठी हे उड्डाण करण्यात आले होते. लडाख भागातील वातावरण वेगळे आहे, त्यामुळे तेथील परिस्थितीचा अंदाज यावा यासाठी वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. चीनने हल्याचा प्रयत्न केला, तर राफेल वैमानिक यासाठी तयार राहणार आहेत. 

CRPF च्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; पुन्हा पुलवामा घडवण्याचा प्रयत्न

संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार, रविवारी सीमा भागात काही मिराज विमानेही उडवण्यात आली आहेत. वायुसेनेने १० सप्टेंबर रोजी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर आयोजित एका कार्यक्रमात राफेल विमानांना दलामध्ये सामिल करुन घेतले. याआधी जूलै महिन्यात फ्रांसमधून ५ राफेल लढाऊ विमाने भारतात पोहोचली होती. ४.५ जनरेशच्या राफेलची सीमा ७८० ते १६५० किलोमीटरपर्यंत आहे. 

भारताने गेल्या तीन आठवड्यात ६ टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. या टेकड्या भारताच्याच हद्दीत आहेत. पण, या टेकड्यांवर भारतीय सैनेने कब्जा केल्यामुळे चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. चीनच्या दादागिरीला भारत आक्रमकतेने उत्तर देत आहे. त्यामुळे चीन बिथरला असून चीन तिबेट भागात युद्धसराव करुन भारताला इशारा देत असल्याचं सांगितलं जात आहे. 

भारत आणि चीनमध्ये होत आहे चर्चा

१५ जून रोजी झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनदरम्यान तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये सोमवारी कमांडर स्तरावर चर्चा होत आहे. कमांडर स्तरावरील ही सहावी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही चर्चा चीनच्या भागातील मोल्हो येथे पार पडणार आहे. दोन्ही देशांनी यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये सैन्य मागे घेण्यावर सहमती दर्शवली होती. मात्र, चीन सैन्य मागे घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहावं लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china stand off ladakh chinese army fired missiles in tibet during night attack drill