'भारत हा राष्ट्रसंघाचा महत्त्वाचा सहकारी' 

पीटीआय
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018


द्वेष आणि हिंसा पसरविण्यासाठी अनेक घटक सोशल मीडियासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यामुळे सर्व देशांनी आपली जबाबदारी आणि पुढील धोका ओळखून एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. 

- अँटोनिओ गुटेरर्स, सरचिटणीस, यूएन

न्यूयॉर्क : दहशतवाद आणि हिंसक कट्टरतावाद रोखण्याच्या प्रयत्नांत भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचे राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरर्स यांनी आज सांगितले. आगामी काळात राष्ट्रसंघ आणि भारतामधील सहकार्य अधिक वाढविण्याची योजना असल्याचेही ते म्हणाले. 

गुटेरर्स हे उद्यापासून (ता. 1) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून त्यानिमित्त त्यांनी "पीटीआय'शी संवाद साधला. "दहशतवादी कट आणि त्यांची अंमलबजावणी देशांच्या सीमा पार करून सर्वत्र पसरत असल्याने सर्व देशांनीही एकत्र येत हिंसक कारवायांना अटकाव घातला पाहिजे. मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद जगाच्या अनेक भागांत पसरले आहेत.

दहशतवादी आता तंत्रज्ञानाचाही वापर करत आहेत. या सर्वांना रोखणे आवश्‍यक आहे. यासाठी राष्ट्रसंघ प्रयत्न करत असून, यामध्ये भारत हा आमचा महत्त्वाचा भागीदार देश आहे,' असे गुटेरर्स म्हणाले. राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी निधीमध्ये भारताने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. भारताने साडे पाच लाख डॉलरची मदत राष्ट्रसंघाला यावर्षी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is an important cooperative organization of the UN