जपानसोबतच्या 'डील'चा भारताला चीनविरोधात होणार फायदा

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 12 September 2020

सध्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हिंदी महासागरामध्येसुद्धा आपले सैन्यबळ अधिक सतर्क केले आहे. भारत आणि जपानदरम्यान झालेला हा करार अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.

नवी दिल्ली : भारत आणि जपान या दोन्ही राष्ट्रात असा एक सामंजस्य करार झाला आहे ज्यामुळे चीनविरोधातील लढ्यात भारताची ताकद आधीपेक्षा वाढू शकते. उभय देशात सैन्यबळाची पूर्तता आणि त्यासंबधी साहित्य आदान-प्रदानाबाबत करार झाला आहे. म्हणजेच जर युद्धपरिस्थिती निर्माण झालीच तर भारत आणि जपान हे एकमेकांना मदत देऊ करतील. याआधी भारताने अमेरिका, फ्रांस, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांशी हा करार केला आहे. भारताचे सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजूकी सतोशी यांनी 'म्यूचुयल लॉजिस्टीक सपोर्ट अरेंजमेंट' (MLSA) या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. याआधी 2016 मध्ये भारत आणि अमेरिकेने 'द लॉजिस्टीक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ एग्रीमेंट (The Logistics Exchange Memorandum of Agreement - LEMOA)' हा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारताला सैन्यबळाशी निगडीत मदत प्राप्त होऊ शकते. 

अपहरण केलेल्या 5 भारतीय तरुणांची चीन सुटका करणार, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

सध्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हिंदी महासागरामध्येसुद्धा आपले सैन्यबळ अधिक सतर्क केले आहे. भारत आणि जपानदरम्यान झालेला हा करार अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. सामंजस्य करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्याबरोबर फोनवर बातचित केली. मोदी आणि आबे या दोघांनीही सुरक्षा कराराबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले आणि आभारही मानले. 
भारत आणि जपानचे रणनीतीविषयक संबध हे आधीपासूनच आहेत.

हाँगकाँग पोलिसांची क्रुरता; 12 वर्षाच्या मुलीविरोधात बळाचा वापर केल्याचा...

जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या करारामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामधील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. अशी अपेक्षा आहे की या करारामुळे जपानी आणि भारतीय सशस्त्र सेना यांच्यात शस्त्र पुरवठा आणि सेवांचे सहज आणि जलद आदान प्रदान होईल. भारतीय संरक्षण मंत्रालयाने असे म्हटले आहे की भारत आणि जपानच्या सशस्त्र दलांमधील परस्पर सहकार्य वाढल्यामुळे उभय देशांमधील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीत द्विपक्षीय सबंध आणखी वाढतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india japan sign mutual military pact to tackle china