काश्मीरचा बळकावलेला भूभाग सोडा! : भारताचा पाकिस्तानला इशारा
न्यूयॉर्क : ‘‘दहशतवादी जेथे मुक्त फिरण्याचा आनंद लुटतात, असा पाकिस्तान हा आगीत तेल ओतण्याचेच काम करीत असला तरी स्वतःला ‘अग्निशामक’ म्हणवून घेत आहे. दहशतवाद्यांना पोसण्याचा पाकिस्तानच्या धोरणाचे परिणाम संपूर्ण जग भोगत आहे,’’ अशा कडक शब्दात भारताने पाकिस्तानला सुनावले. काश्मीरमधील पाकिस्तानने बेकायदा बळकावलेल्या भूभागावरील ताबा पाकिस्तानने त्वरित सोडावा, असा इशाराही भारताने दिला.
संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेच्या ७६ व्या सत्रात शनिवारी सकाळी (भारतीय प्रमाणवेळे नुसार) इम्रान खान पाकिस्तानमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण केले. त्यांनी नेहमीप्रमाणे काश्मीर राग आळवलाच शिवाय भारताविरोधात खोट्या आरोपांची गरळच ओकली. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी त्याच व्यासपीठावरून धडाकेबाज भाषण करीत पाकिस्तानच्या आरोपांचा समाचार घेतला व इम्रान खान यांची वक्तव्ये त्यांच्यावरच उलटवली. ‘राइट टू रिप्लाय’अंतर्गत उत्तर देताना त्यांनी दहशतवाद आणि अल्पसंख्याकांच्या स्थितीवर पाकिस्तानला त्यांचा चेहरा आरशात दाखविला. दुबे म्हणाल्या, ‘‘पाकिस्तानच्या नेत्यांनी माझ्या देशाच्या अंतर्गत बाबी या मंचावर उपस्थित करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे. जागतिक व्यासपीठावर बोलताना पाकिस्तान आमच्या विरोधात सतत खोटे बोलत आहे. दुर्दैवाने हे पहिल्यांदाच होत नसून पाकिस्तान भारताविरोधात खोटा व द्वेषयुक्त प्रचारासाठी ‘यूएन’ने उपलब्ध केलेल्या या व्यासपीठाचा दुरूपयोग पाकिस्तान करीत आहे.’’
३७० कलम रद्द करण्याच्या भारत सरकारच्या ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या निर्णयाचा मुद्दा जाणीवपूर्वक उपस्थित करीत इम्रान खान यांनी आमसभेत बोलताना काश्मीरविरोधी सूर आळवला. तसेच पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी नेते सईद अली शाह गिलानी यांच्या निधनाचाही उल्लेख केला. त्यावर जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत पाकिस्तान हा दहशतवादाचे समर्थन करणारा देश असल्याचे सुनावत जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि भविष्यातही कायम राहणार आहे, असे त्यांनी ठणकावले. पाकिस्तानने बेकायदा बळकावलेल्या भागाचाही यात समावेश आहे. या भूभागावरील ताबा पाकिस्तानने सोडावा, असा इशाराही भारताने दिला
पाकिस्तानचा बनाव
‘‘पाकिस्तान हा ‘दहशतवादाचा बळी’ आहे, असे आपण नेहमी ऐकतो. पण अग्निशामक असल्याचे भासवून आग भडकावणारा तो देश आहे. शेजाऱ्यांना नुकसान पोचविण्याच्या हेतूनेच त्या देशात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. त्यांच्या या नीतीने आमच्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला त्रास होत आहे. दहशतवादी कारवायांच्या नावाखाली ते त्यांच्या देशातील वांशिक हिंसाचार लपवीत आहे. पाकिस्तानमधील वाईट परिस्थितीवरून लक्ष हटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मुक्त संचार करण्यासाठी मोफत पास मिळालेला आहे तर दुसरीकडे तेथील सामान्य लोकांचे विशेषतः अल्पसंख्याकांची दुर्दशा झाली आहे,’’ अशी टीका दुबे यांनी केली.
त्या म्हणाल्या की, पाकिस्तानचे धोरण तसेच दहशतवाद्यांना आश्रय आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या इतिहासाशी सदस्य देश परिचित आहेत. दहशतवाद्यांना उघडपणे पाठिंबा देणे, प्रशिक्षण देणे व शस्त्रांचा पुरवठा करणारा देश अशी पाकिस्तानची जगात ओळख आहे.
‘पाकिस्तानला भारत समजणे अवघड’
भारताची बाजू मांडताना स्नेहा दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानच्या उलट भारत हा विविधता असलेला लोकशाहीवादी देश आहे, जेथे राष्ट्रपती, पंतप्रधान. सरन्यायाधीश, लष्कर प्रमुखांसारख्या देशातील सर्वोच्च पदांवर अल्पसंख्याक व्यक्तींना सन्मान दिला जातो. भारतात घटनेवर पालन करीत तिचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था व स्वतंत्र माध्यमे आहेत. येथे विविधता तर एवढी आहे की त्याबद्दल समजून घेणे पाकिस्तानला अवघड आहे. तेथे तर घटनात्मक दृष्टीने देशाच्या उच्च पदांवर अल्पसंख्याकांची नियुक्ती करण्यास मनाई आहे.
इम्रान खान यांची गरळ
५ ऑगस्ट २०१९ नंतर भारताने काश्मीरमध्ये अनेक बेकायदा आणि एकतर्फी निर्णय घेतले
भारतीय लष्कर काश्मिरी नागरिकांवर अत्याचार करीत आहे
बळाचा वापर करीत शांततेत होणारी आंदोलने दाबत आहे
‘यूएन’च्या प्रस्तावानुसार काश्मीरमध्ये जनमत आजमावावे
आज जगाच्या समोर आज ‘‘इस्लामोफोबिया’चा धोका
भारतातील २० कोटी मुस्लिमांवर अत्याचार
भारतातील मुसलमान दहशतीखाली
पाकिस्तान भारतासह सर्व शेजारी देशांबरोबर शांततेचे संबंध ठेवू इच्छित आहे. पाकिस्तानबरोबर ठोस व निर्णायक चर्चेसाठी वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी भारताची आहे.
- इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.