इम्रान यांना भारताचे प्रत्युत्तर

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

- पाकिस्तान हेच दहशतवादाचे उगमस्थान 
- जगाची दिशाभूल थांबविण्याचे आवाहन

नवी दिल्ली ः "पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेला हल्ला ही दहशतवादी घटना असल्याचे मान्य करण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांनी नाकारणे ही भारतासाठी आश्‍चर्याची बाब नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वाधिक बळी ठरलेला देश असल्याचा त्यांचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असून, पाकिस्तान हेच दहशतवादाचे उगमकेंद्र असल्याचे आंतरराष्ट्रीय जगतात मान्य झालेले वास्तव आहे,'' अशा शब्दांत भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. 

पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात खान यांनी आज निवेदन करून त्याचा आणि पाकिस्तानचा संबंध नसल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे या हल्ल्याचे कारण पुढे करून भारताने काही आगळीक केल्यास पाकिस्तानने त्यास चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याची धमकीही दिली. भारतात निवडणूक असल्याने पाकविरोधी उन्माद भडकविला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे एक निवेदन जारी करण्यात येऊन त्यांच्या वक्तव्याचे खंडन करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्याचा निषेध करणे किंवा त्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करण्याचे सौजन्यदेखील खान यांनी दाखविले नसल्याबद्दल खेद व्यक्त करून भारताने म्हटले आहे, की या दहशतवादी हल्ल्यापासून स्वतःला दूर राखणे किंवा त्याच्याशी संबंध नसल्याची पाकिस्तानची भूमिका नवीन नाही. या हल्ल्याची जबाबदारी जैशे महंमद संघटनेने घेऊनही खान यांनी त्याकडे सोईस्कर दुर्लक्षाचा पवित्रा घेतला. "जैश' संघटना आणि तिचा म्होरक्‍या मसूद अजहर हा पाकिस्तानातच आहे हे सर्व जगाला माहिती आहे आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास तेवढा पुरावा पुरेसा आहे. 

भारताने पुरावे दिले तर पाकिस्तान तपास करील ही त्यांनी नेहमीचीच लंगडी सबब पुढे केली आहे. मुंबईवरील हल्ला, पठाणकोट हवाई तळावरील हल्ला यांचे भरपूर पुरावे देऊनही पाकिस्तानने त्यावर कारवाई केलेली नाही. दोन्ही प्रकरणे अजूनही रेंगाळत पडलेली आहेत. त्यामुळे पुरावे दिल्यास कारवाई करण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे आश्‍वासन पोकळ आहे, असे भारताने स्पष्ट केले. 

पाकिस्तानी पंतप्रधानांनी "नवीन पाकिस्तान' व नव्या विचाराच्या पाकिस्तानचा उदय झाल्याचा केलेला दावाही भारताने हास्यास्पद ठरवला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हफीज सईद याच्याबरोबरीने या तथाकथित नव्या पाकिस्तानचे मंत्री व्यासपीठ भूषवीत असतात अशा शब्दांत भारताने हा दावा हास्यास्पद ठरवला. 

दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणात सर्वंकष संवादासाठी भारताने नेहमीच तयारी दर्शविली आहे आणि यामध्ये दहशतवादाचाही समावेश असला पाहिजे यावर भारत कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुलवामा हल्ला आणि भारतातील आगामी निवडणुकांचा संबंध जोडण्याच्या इम्रान खान यांच्या वक्तव्याचेही भारताने तीव्र शब्दांत खंडन केले असून, भारतीय लोकशाही ही जागतिक पातळीवर आदर्श मानली गेलेली आहे व ती बाब पाकिस्तानला न समाजणारी आहे. पाकिस्तानने हे प्रकार थांबवून त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांविरुद्ध त्वरित कारवाई सुरू करावी व जगाची दिशाभूल करण्याचे प्रकार थांबवावेत, असा सल्लाही भारताने दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india response to Imran Khan On pulwama attack