esakal | भारत-रशिया चर्चेत मोदींचा पाकला इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

India-Russia discussion Modi warned Pakistan

भारत-रशिया चर्चेत मोदींचा पाकला इशारा 

sakal_logo
By
पीटीआय

ब्लादिवोस्तोक  - कोणत्याही देशातील अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यास भारत आणि रशियाचा विरोधच आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा जम्मू-काश्‍मीर संदर्भातील भारताची भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानलाही सूचक इशारा दिला.

सध्या रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आज अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेत त्यांच्याशी व्यापार आणि गुंतवणुकीतील द्विपक्षीय सहकार्य, तेल आणि नैसर्गिक वायू, आण्विक ऊर्जा, संरक्षण, अंतराळ आणि सागरी सहसंपर्क आदी बाबींवर विस्ताराने चर्चा केली. मोदी हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आले असून, ते येथे "इस्टर्न इकॉनॉमिक फोरम'च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला भेट देणारे मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. पुतीन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम भारताने संपुष्टात आणल्यानंतर पाकने याच मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर आकांडतांडव करायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात रशियानेही आपले माप भारताच्या बाजूने टाकले होते. 

आण्विक सहकार्य 
भारत आणि रशिया विसाव्या वार्षिक संमेलनामध्ये उभय देशांच्या नेत्यामध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा पार पडली असून, या वेळी द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मतैक्‍य झाले. व्लादिवोस्तोक ते चेन्नई दरम्यान पूर्णक्षमतेचा सागरी मार्ग बनविण्याचा प्रस्तावही भारताकडून सादर करण्यात आला तसेच व्लादिवोस्तोक ते चेन्नईदरम्यान सागरी संवाद मार्गाच्या विकासासंबंधीच्या करारपत्रावरही या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियाच्या सहकार्यामुळे आण्विक प्रकल्प अधिकाधिक स्थानिक होत असून, आम्ही या क्षेत्रामध्येही खरे मैत्रीसंबंध विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. भारत रशिया मैत्री केवळ त्यांच्या राजधानीच्या शहरांपुरती मर्यादित नसून, जनता हीच या देशांच्या केंद्रस्थानी आहे, असेही मोदी म्हणाले. 

गगनयान प्रकल्पाअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना रशियाच प्रशिक्षण देणार असून, दोन्ही देशांनी या वेळी विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी पंधरा सामंजस्य करार केले आहेत. दोन्ही देशांतील मैत्रीसंबंध आणि सहकार्य हे वेगाने विकसित होत असून, या रणनीतीक सहकार्यामुळे लोकांच्या विकासाला हातभार लागत आहे. 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

जहाजबांधणी कारखान्यास भेट 
पंतप्रधान मोदी यांनी आज पुतीन यांच्यासमवेत झ्वेझ्दा येथील जहाजबांधणी कारखान्याला भेट दिली. या वेळी मोदींनी नौकाबांधणी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचीही माहिती करून घेतली तसेच कंपनीचे व्यवस्थापन आणि तेथील कामगारांशीही त्यांनी संवाद साधला. मोदींनी ट्विटच्या माध्यमातून या भेटीची माहिती दिली. आर्किटक क्षेत्रातील जहाजबांधणीमध्ये या कारखान्याचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

निमंत्रण 
जर्मनी आणि मित्र राष्ट्रांविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला 2020 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त मॉस्कोमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पुतीन यांनी मोदींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिक्‍स राष्ट्रांचे संमेलन होणार असून, या संमेलनामध्येही मोदी आणि पुतीन यांची पुन्हा भेट होण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top