esakal | H-1B व्हिसा धोरणात बदल; भारतीयांना होणार फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

H-1B व्हिसा धोरणात बदल; भारतीयांना होणार फायदा

- नव्या व्हिसा धोरणात गुणवत्ता केंद्रस्थानी 
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा 
- हजारो भारतीयांना होणार फायदा 

H-1B व्हिसा धोरणात बदल; भारतीयांना होणार फायदा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली असून, नव्या बदलांमुळे जगभरातील गुणवत्तेला अमेरिकेकडे आकर्षित करण्यात यश मिळेल, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

नव्या व्हिसा धोरणामध्ये गुणवत्तेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्याचा परवाना देताना वय, ज्ञान, नोकरीच्या संधी आणि नागरिकत्वाबाबतची समज आदी मुद्यांचा विचार केला जाणार आहे. इंग्रजी भाषा आणि नागरिकत्वाबाबतच्या चाचण्या कायम राहणार आहेत. नव्या बदलांमुळे जगभरात कोठेही सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या डॉक्‍टर, संशोधक, विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जुन्या पद्धतीमध्ये हे शक्‍य होत नव्हते, असे ट्रम्प यांनी आपल्या धोरणविषयक भाषणात स्पष्ट केले. 

हजारो भारतीयांना होणार फायदा 
अमेरिका दर वर्षी सुमारे 1.1 दशलक्ष ग्रीन कार्ड जारी करते. ग्रीन कार्डच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्याचा आणि काम करण्याचा परवाना मिळतो. तसेच, पाच वर्षांनंतर अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्गही खुला होते. नव्या धोरणानुसार अतिकुशल कर्मचाऱ्यांचा कोटा 12 टक्‍क्‍यांवरून 57 टक्के करण्यात येणार आहे. या धोरणाचा हजारोंच्या संख्येतील भारतीयांना लाभ होणार असल्याचे मानले जाते.

loading image
go to top