चीनला सडेतोड उत्तर; विरोध असूनही भारताने दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली युद्धनौका

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

गलवान खोऱ्यातील १५ जूनच्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमकता दाखवली आहे.

नवी दिल्ली- गलवान खोऱ्यातील १५ जूनच्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात आक्रमकता दाखवली आहे. भारताने दक्षिण चिनी समुद्रामध्ये आपली युद्धनौका तैनात केली आहे. भारताच्या या कृतीने चीनचा तिळपापड झाला आहे. चीनने दक्षिण चिनी समुद्रामध्ये भारताने युद्धनौका तैनात करण्यावर आपत्ती घेतली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

चीनने २००९ पासून दक्षिण चिनी समुद्रातील आपला प्रभाव वाढवला आहे. चीनने या भागात अनेक कृत्रिम बेटांची निर्मिती केली आहे. शिवाय अधिकांश भागावर चीनने आपला दावा ठोकला आहे. चीनकडून या भागात मोठ्या प्रमाणात लष्करी उपस्थिती वाढली आहे. आता भारताने चीनच्या दबावाला बळी न पडता, थेट दक्षिण चिनी समुद्रातच युद्धनौका तैनात केल्याने चीन संतापला आहे. 

तीबेट भोवती अभेद्य भींत उभारणार; शी जिनपिंग यांचे सूतोवाच

गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तसेच चीनचेही ४० जवान मेल्याची माहिती दिली जाते. त्यामुळे चीन आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उभय देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे. आता दक्षिण चिनी समुद्रातही दोन्ही देशांमध्ये तणाव वाढणार आहे. भारताची एक युद्धनौका समुद्रात तैनात असल्याने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आक्षेप घेतला आहे. कोणत्याही देशाची युद्धनौका या भागात तैनात करण्यास चीनचा विरोध आहे.

भारत आणि चीनमध्ये सीमा भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा पार पडत आहे. अशात भारताने दक्षिण चिनी समुद्रात युद्धनौका तैनात केल्याने चीनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत भारताला विचारणा केली आहे. विशेष म्हणजे दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनेही विनाशक आणि फ्रिगेट्स तैनात केले आहे. शिवाय भारत आणि अमेरिका या भागात एकमेकांशी संपर्क ठेवून आहेत.

मार्क झुकरबर्ग यांनी मागितली माफी, म्हणाले 'पोस्ट हटवायला हवी होती'

याच दरम्यान, भारतीय नौदलाचे काही जहाज टँकर्स  मलाक्का स्ट्रेट आणि अंदमान आणि निकोबार बेटांजवळ तैनात केले आहेत. चीनचे नौदल याच भागातून हिंदी महासागरातील हालचाली पाहण्यासाठी येत असतं. शिवाय याच भागातून चीनचे तेल टँकर जात असतात. त्यामुळे दक्षिण समुद्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला हाताळण्यासाठी भारत तयारी करत आहे. या भागातील चीनच्या प्रत्येक हालचाली भारतीय नौदल टीपत आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Navy Sent Warship To South China Sea After Ladakh Clash