भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे पंतप्रधान; जॉनसन यांच्या गच्छंतीची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे पंतप्रधान

भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे पंतप्रधान

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्या सरकारी निवासावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केलेली दारुची पार्टी त्यांना आता महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात असलेली जनतेची नाराजी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय की, असं सांगितलं जातंय की लवकरच जॉनसन (Boris Johnson) यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. दुसरीकडे, ही बातमी मात्र भारतासाठी आनंददायी ठरु शकते. कारण जर बोरिस जॉनसन हे आपल्या पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू (Britain’s PM post) शकतात. सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. (Indian-origin Rishi Sunak)

हेही वाचा: आणखी आठ आमदार पक्षात; अखिलेश यादव म्हणतात, 'या भाजपच्या हिट विकेट्स'

बोरिस जॉनसन यांनी मागितली माफी

ज्या प्रकरणावरुन हे सगळं राजकारण तापलं आहे ती घटना आहे 2020 मधील, जेंव्हा कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागला होता. त्यावेळी मे महिन्यामध्ये पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला सरकारी निवास डाउनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी ठेवली होती तसेच त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ फासण्यात आलं होतं. ही गोष्ट उजेडात आल्यानंतर जॉनसन यांच्यावर विरोधकच नव्हे तर त्यांच्याही पक्षाचे लोक टीका करत आहेत. ब्रिटनच्या जनतेमध्ये देखील याबद्दल नाराजी आहे. यामुळेच गेल्या बुधवारी त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माफी मागावी लागली आहे. या व्यतिरिक्तही त्यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढतोच आहे.

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जॉनसन यांनी म्हटलंय की, मी माफी मागू इच्छितो. मला माहितीय की गेल्या 18 महिन्यांपासून लाखो लोकांनी असाधारण असं बलिदान दिलं आहे. मला याची जाणीव आहे की, लोक माझ्याबद्दल आणि माझ्या सरकारबद्दल काय विचार करत असावेत. खासकरुन तेंव्हा जेंव्हा त्यांना माहिती झालंय की, नंबर 10 मध्ये नियमांचं पालन केलं जात नाहीये.

हेही वाचा: नवऱ्यासाठी नव्हे तर... वजनदार पत्नी स्लिम झाली; अन्...

सुनक पंतप्रधानपदी येण्याची दाट शक्यता

या दरम्यानच ब्रिटनची सट्टा कंपनी 'बेटफेयर'ने (Betfair) असा दावा केलाय की, या संकटामध्ये अडकलेल्या बोरिस जॉनसन यांना लवकरच राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच त्यांच्या जागी भारतीय वंशांचे अर्थमंत्री ऋषी सुनक त्यांची जागा घेऊ शकतात. 'बेटफेयर' च्या सॅम रॉसबॉटम यांनी सांगितलं की, जॉनसन यांना हटवल्यानंतर पंतप्रधान पदाला गवसणी घालण्याची सर्वाधिक शक्यता ही ऋषी सुनक यांच्या नावाची आहे. ते पंतप्रधान बनू शकतात.

रॉसबॉटम यांनी पुढे म्हटलंय की, या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस, कॅबिनेट मंत्री मायकल गोव, माजी परराष्ट्र मंत्री जेरेम हंट, भारतीय वंशांच्या गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉऊडेन यांचीही नावे सामील आहेत.

कोण आहेत सुनक?

ऋषी सुनक यांचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला होता. 39 वर्षीय सुनक 2015 मध्ये रिचमंड मतदारसंघातून खासदार झाले आहेत. त्यांनी ब्रिटनच्या विंचेस्टर कॉलेजमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं आहे. ते सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. याआधी ते गृहनिर्माण मंत्री होते. त्यांचे आई-वडिल पंजाबमधून ब्रिटनला गेले होते. ऋषी सुनक यांचा इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिच्यासोबत विवाह झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top