esakal | भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

बोलून बातमी शोधा

Aeroplane
भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही
sakal_logo
By
पीटीआय

टोरांटो - कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर केलेली ही सर्वांत दीर्घकाळाची प्रवासबंदी आहे. संसर्गवाढीमुळे ब्रिटन,ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरनेही भारतावर तात्पुरती प्रवासबंदी लागू केली आहे.

भारत आणि पाकिस्तानवर असलेली प्रवासबंदी कालपासूनच लागू करण्यात आली. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कॅनडाने बंदी घातली असली तरी मालवाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट, भारताकडून कॅनडाला १५ लाख लशींची निर्यात होणे अपेक्षित असल्याचे कॅनडाच्या वाहतूक मंत्र्यांनी सांगितले. भारतात रुग्णवाढीमुळे लसनिर्यातीवर परिणाम झाला असून जूनपर्यंत कॅनडाला लस मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

‘रेड लिस्ट’ची अंमलबजावणी सुरु

लंडन - भारतातील संसर्गवाढीमुळे ब्रिटनने ‘रेड लिस्ट’मध्ये नाव समाविष्ट केल्यानंतर आता या देशाने आजपासून भारतावर नवे निर्बंध लागू केले आहेत. यामुळे भारतातील प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या डबल म्युटंट (बी. १६१७) प्रकाराचा संसर्ग झालेले ५५ रुग्ण आढळल्यानंतर ब्रिटनने रेड लिस्टमध्ये भारताचे नाव टाकले होते. हा विषाणू अधिक वेगाने पसरतो का आणि लसीकरणामुळे या विषाणूपासून बचाव होऊ शकतो का, याचा अभ्यास केला जात आहे.

सिंगापूरकडून नियमावली कडक

सिंगापूर : मागील १४ दिवसांमध्ये भारतात प्रवास केलेल्या कोणत्याही प्रवाशाला सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यास किंवा सिंगापूरमार्गे प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २४) हे निर्बंध लागू असतील. संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरने अधिक कडक नियमावली तयार केली आहे. याशिवया, जे नुकतेच भारतात जाऊन आले असतील आणि १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला नसेल, त्यांनाही विलगीकरणात जावे लागणार आहे.