इम्रान खानच्या मदतीचा चेंडू भारताने सीमापल्ल्याड टोलावला

टीम ई-सकाळ
Friday, 12 June 2020

इम्रान खान यांच्या 'या' प्रस्तावावर भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची असलेली दयनीय स्थितीची आठवण करून दिली आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या कोरोना काळात भारताला मदत करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर इम्रान खान यांच्या या ऑफरला भारताने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सरकारच्या रोख हस्तांतरण योजनेचा अनुभव भारतासोबत शेअर करण्याचा प्रस्ताव दिला होता. इम्रान खान यांच्या या प्रस्तावावर भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची असलेली दयनीय स्थितीची आठवण करून दिली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरातील सगळ्याच देशात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेला याची मोठी झळ बसली असून, यातून सावरण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. मात्र या परिस्थितीत देखील पाकिस्तानने पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल गुरुवारी ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करत, कोरोनाच्या संकटामुळे भारतातील ३४ टक्के गरिबांची स्थिती अत्यंत हालाखीची असल्याचे म्हणत, आपल्या सरकारच्या रोख हस्तांतरण योजनेचा अनुभव भारतासोबत शेअर करण्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इम्रान खान यांच्या या प्रस्तावाला जोरदार प्रत्युत्तर देत, कोरोना काळात भारताने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज हे पाकिस्तानच्या संपूर्ण वार्षिक राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) पेक्षा अधिक असल्याचे सुनावले आहे. यासोबतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी, पाकिस्तान हा देश आपल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी बाहेरच्या देशातील बँकेमध्ये पैसे पाठविण्यासाठी ओळखला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तान हा कर्जाच्या खाईत डुबलेला असल्याची आठवण अनुराग श्रीवास्तव यांनी करून देत, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चांगला सल्लागार नेमण्याची गरज असल्याचा टोला देखील लगावला आहे.     

दरम्यान, भारत सरकारने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी मागील महिन्यात २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अधिकच खालावली असल्याचे म्हटले होते. व यासाठी इम्रान खान यांनी ३.७ अब्ज डॉलरच्या कर्जाची मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि आशियाई शिखर बँकेकडे केली होती. याव्यतिरिक्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत, पाकिस्तानवर असलेल्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात दिलासा देण्याची मागणी केली होती.            

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's response on Pakistan Prime Minister Imran Khan's offer