esakal | भारताचे अडकलेले ट्रक परतीच्या वाटेवर
sakal

बोलून बातमी शोधा

भारताचे अडकलेले ट्रक परतीच्या वाटेवर

भारताचे अडकलेले ट्रक परतीच्या वाटेवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काठमांडू: नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे दहा दिवसांपासून बंद असलेले रस्ते आता हळहळू मोकळे होत आहेत. त्यामुळे भारताचे ठिकठिकाणी अडकलेले सुमारे ८५६ मालट्रक परतीच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे बर्दघाट-मुगलिंग मार्गावरील वाहतूक वळवल्याने काठमांडूत पोचण्यासाठी २४ तासांपेक्षा अधिक काळ लागत आहे. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्याने भारत-नेपाळ सीमेवरील सौनोली येथे मालट्रकच्या दहा ते बारा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या.

हेही वाचा: पंजशीर सोडून पळाले तालिबान विरोधी गटाचे नेते मसूद आणि सालेह

नेपाळचे अधिकारी दिलीप गिरी म्हणाले की, भूस्खलनामुळे रस्त्यात अडकून पडलेले ८५६ मालट्रक बाहेर काढण्यात आले असून ते बिहार, राजस्तान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, हरियाना, पंजाब आणि जम्मू काश्‍मीरला रवाना केले आहेत. रस्ते खराब असल्याने मालट्रकची वाहतूक संथ झाली आहे. त्यामुळे काही तासांच्या प्रवासाला चोवीस तास लागत आहेत. वाहतूक सुरळीत झाली असली तरी वाहनांची कोंडी झालेली आहे. काल सकाळी किरकोळ भूस्खलनाचे प्रकार घडले. परंतु ते तातडीने दूर करण्यात आले.

नागधुंदा-नौबिस मार्ग खंड येथे भूस्खलन झाल्याने रस्ते अजूनही खराबच आहेत. नेपाळमधील भूस्खलनानंतर सौनोली सीमेवर मालट्रकची रांग लागली आहे. सोनोली ते नौतनवा टोल नाक्यांपर्यंत सुमारे १२ किलोमीटरचा जाम झाला आहे. नेपाळ प्रशासनाने भन्सार पार्किंगमध्ये जागा मोकळी केली असून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काठमांडूत मुसळधार पाऊस

राजधानी काठमांडूत मुसळधार पावसामुळे पूर आला असून ३८० हून अधिक घरांत पाणी शिरले आहे. सखल भागात पाणी साचल्याचे पोलिसांनी आज सांगितले. नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळच्या सैनिकांनी काल रात्री १३८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मनोहरा नदी, कडागरी, टेकू आणि बाल्खू क्षेत्रात नदीकाठच्या भागात बचावकार्य वेगाने राबवले. काठमांडू येथे नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरले असून सर्व भाग जलमय झाला आहे. काठमांडूत चार तासात १०५ मिलीमीटर पाऊस पडला. पुरामुळे सुमारे ३८२ घरात पाणी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top