India Poverty : गरीबी कमी करण्यात भारताला यश; ‘यूएनडीपी’चा अहवाल

जगभरात गरीबी ही अद्यापही मोठी समस्या असल्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर झालेल्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले.
India Poverty
India Povertysakal

न्यूयॉर्क - जगभरात गरीबी ही अद्यापही मोठी समस्या असल्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये सादर झालेल्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले असले तरीही काही निवडक देशांना त्यांच्या पातळीवर गरीबी घटविण्यात यश आल्याचेही दिसून आले आहे. या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश असून गेल्या १५ वर्षांमध्ये ४१ कोटींहून अधिक लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे.

संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्सफोर्ड गरीबी व मानवविकास पुढाकार (ओपीएचआय) यांनी संयुक्तपणे बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय) अहवाल प्रसिद्ध केला आहे. गरीबी दूर करणे ही आवाक्यातील बाब असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

गरीबीच्या स्थितीचा अभ्यास करताना २००० ते २०२२ या काळाचा विचार केला गेला, तर ८१ देशांतील परिस्थितीवर विशेष लक्ष देण्यात आले. यापैकी २५ देशांना मागील १५ वर्षांच्या काळात ‘एमपीआय’ निम्म्याने खाली आणण्यात यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. या देशांमध्ये भारत, कंबोडिया, चीन, काँगो, होंडुरास, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

विशेषत: भारताची कामगिरी उल्लेखनीय असून २००५-०६ ते २०१९-२१ या कालावधीत ४१ कोटी ५० लाख जणांना गरीबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे. चीनने चार वर्षांत (२०१० ते २०१४) या काळात सहा कोटी ९० लाख जणांना, तर इंडोनेशियाने पाच वर्षांत (२०१२ ते २०१७) ८० लाख जणांना गरीबीतून बाहेर काढले आहे.

या देशांनी चार वर्षे ते बारा वर्षे अशा विविध कालमर्यादेत ‘एमपीआय’ निम्म्यावर आणला आहे. म्हणजेच, १५ वर्षांच्या काळात आपापल्या देशांमधील गरीबी निम्म्यावर आणण्याचे ठरविण्यात आलेले शाश्‍वत विकास उद्दिष्ट साध्य करता येण्यासारखे आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच, गरीबीच्या राष्ट्रीय व्याख्येला सामावून घेणाऱ्या बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा वापर करणे आवश्‍यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभरातील स्थिती

  • एक अब्ज दहा कोटी गरीबीत (१८ टक्के)

  • ८० टक्के गरीब आफ्रिका आणि दक्षिण आशियात

  • दोन तृतियांश गरीब मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये

  • १८ वर्षांखालील गरीब नागरिकांपैकी निम्मे

  • ८४ टक्के गरीब ग्रामीण भागात राहतात

जगाची अन्नान्नदशा (२०२२)

  • २.४ अब्ज : लोकांना नियमितपणे अन्न उपलब्ध नाही

  • ७८.३० कोटी : जणांसमोर भुकेची समस्या

  • १४.८० कोटी : बालकांची वाढ खुंटली

  • ३.१ अब्ज : लोक सकस आहारापासून वंचित

  • ७० कोटी (सरासरी) : लोक कुपोषित

  • ४.५ कोटी : बालकांचे (पाच वर्षांखालील) वजन अत्यंत कमी

  • ३.७ कोटी : बालकांचे (पाच वर्षांखालील) वजन अत्यंत जास्त

कोरोनामुळे गती मंदावली

गरीबी हटविण्याचे शाश्‍वत ध्येय निश्‍चित केल्यानंतर २०१९ पर्यंत हे ध्येय पूर्ण करण्यासाठी वेगाने प्रयत्न होत होते. मात्र कोरोना संसर्गस्थितीमुळे ही गती मंदावली आणि गरीबी दूर करण्याचा वेग कमी झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

या काळात गरीबीबाबतची आकडेवारीही गोळा होऊ शकली नाही. त्यामुळे, याबाबतची विश्‍वासार्ह आकडेवारी गोळा करून आणि वास्तव परिस्थिती समोर ठेवून पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com