Indonesia Earthquake : भूकंपबळींची संख्या २६८ वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Earthquake News

Indonesia Earthquake : भूकंपबळींची संख्या २६८ वर

चिआन्जुर : इंडोनेशियातील जावा बेटाला सोमवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातील मृतांची संख्या २६८ वर पोहोचली आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून बचाव आणि मदत कार्याला वेग आला. अद्याप १५१ जण बेपत्ता असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.

जावा बेटाला बसलेल्या ५.६ रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपामुळे एक हजाराहून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका चिआन्जुर शहराला बसला आहे. या ठिकाणी अनेक बचावपथके दाखल झाली असून बुलडोझरच्या साह्याने ढिगारे हटविण्याचे काम सुरु आहे.

ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपानंतर येथील एका शाळेची इमारतही कोसळल्याने मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांच्यासाठी सरकारने आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

रुग्णालये भरली

भूकंपामुळे चिआंन्जुरमध्ये सर्वत्र पडझड झाली असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. भूकंपाच्या हादऱ्यांमुळे काही ठिकाणी दरडीही कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. अनेक दुर्गम भागांमध्ये अद्यापही मदत पोहोचलेली नाही. जखमींची संख्या मोठी असल्याने येथील सर्व रुग्णालये भरली आहेत. रुग्णालयांच्या बाहेरच अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. भूकंपामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी छावण्या उभारण्यात आल्या असून आवश्‍यक कपडे, पांघरूण, खाद्यपदार्थ, पाणी यांचा पुरवठा त्यांना केला जात आहे.