Indonesia Earthquake : भूकंपामुळे इंडोनेशिया हादरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Earthquake

Indonesia Earthquake : भूकंपामुळे इंडोनेशिया हादरला

जाकार्ता : इंडोनेशियामधील जावा बेटाला आज सकाळी भूकंपाचा धक्का बसून किमान ६२ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी होती.

जावा बेटाच्या पश्‍चिम भागातील चिआंन्जुर येथे भूकंपाचा धक्का बसला. राजधानी जाकार्तापासून हे ठिकाण शंभर किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे हादरे जाणवू लागताच अनेक नागरिक रस्त्यांवर पळाले.

अंगावर इमारतींच्या भिंती पडल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला, असे इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चिआन्जुर भागात भूकंपामुळे अनेक ठिकाणी दरडीही कोसळल्या. या नैसर्गिक आपत्तीमुळे किमान ४६ नागरिकांचा मृत्यू झाला असून सातशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ग्रेटर जाकार्ता भागात भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. यामुळे रुग्णालये, शाळा आणि इतर अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले.

कायमच भूकंपाचा धोका

बेटांचा समूह असलेल्या इंडोनेशियाला कायमच भूकंपाचा धोका आहे. मात्र, जाकार्ताला तुलनेत कमी प्रमाणात धक्के जाणवतात. इंडोनेशिया हा देश ‘रिंग ऑफ फायर’वर (ज्वालामुखीच्या पट्ट्यावर आणि भूप्रतल सीमेवर) असल्याने येथील सुमारे २७ कोटी नागरिकांसाठी भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामी या नैसर्गिक आपत्ती नित्याच्या आहेत.

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यातही पश्‍चिम सुमात्रा बेटाला ६.२ रिश्‍टरचा भूकंपाचा धक्का बसून २५ जणांचा मृत्यू, तर ४६० जण जखमी झाले होते. त्याआधी जानेवारी महिन्यातही सुलावेसी प्रांताला ६.२ रिश्‍टर तीव्रतेचा धक्का बसून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. २००४ मध्ये आलेल्या सुनामीमुळे हिंद महासागर क्षेत्रात दोन लाख तीस हजार जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक जण इंडोनेशियातील होते.