'रिहॅबिलिटेशन मेडिसिन’ विकसित करणाऱ्या डॉ. रस्क यांची कहाणी

rusk institute of rehabilitation medicine doctor rusk 
inspirational story
rusk institute of rehabilitation medicine doctor rusk inspirational storyTeam eSakal

काल एक शोकांतिका सांगीतली आज एका आनंदयात्री माणसाची छानशी सकारात्मक गोष्ट सांगतो..

मायकल आणि ऑगस्टा या दाम्पत्याचा हा मुलगा बालपणी अगदी चारचौघांसारखा आनंदी शाळकरी मुलगा होता..

कुणास ठाऊक कसं? पण वयाच्या अकराव्या वर्षी त्याला वैद्यकिय क्षेत्र खुणावू लागलं..

‘तु मोठं होऊन काय बनणार?’ या प्रश्नाला उत्तर देण्याचा खरं तर तो काळ..

ढोबळ उत्तरं सगळेच देतात-काही ठामही असतात पण त्या दृष्टिनं लगेच पाऊल किती टाकतात? तर अगदी मोजके..

तो त्याच मोजक्या मुलांपैकी एक होता..

त्यानं गावातल्या एका डाॅक्टरकडं त्याला आपल्या दवाखान्यात येत तिथलं कामकाज न्याहाळण्याची परवानगी मागितली..

डाॅक्टरांनी हिरवा कंदिल दाखवला अन् बदल्यात त्याला शस्रक्रियेचं साहित्य धुणं-पेशंटच्या घरी जाऊन ड्रेसिंग करणं अशी काम सोपवण्यात आली..

तो विद्यार्थी म्हणून फार काही हुशार नव्हता उलटपक्षी खरं सांगायचं तर अभ्यासात तसा तो सर्वसाधारणच होता पण त्याच्याकडं एक ‘सच्चेपणा’ नक्की होता..

शालेय शिक्षण संपल्यानंतर तो मिसुरी विद्यापीठात दाखल झाला..

दुसऱ्या वर्षांला असतांना पहिल्या महायुद्धकाळात त्याचं कुटूंब देशोधडीला लागलं..

त्याच्या वडिलांनी त्याला नाईलाजानं “शिक्षण सोडत कुटुंबास हातभार लावावा” असा विनंतीवजा आदेश दिला पण आईनं यावर तीव्र आक्षेप घेत “मुलाचं शिक्षण थांबता कामा नये” अशी ठाम भूमिका घेतली..

rusk institute of rehabilitation medicine doctor rusk 
inspirational story
चीनच्या उलट्या बोंबा, कोरोना पसरवण्यासाठी 'हे' 3 देश जबाबदार

मेलोड्रामा आपल्याकडंच होतो असं नाही..

तिथंही मोठा फॅमिली ड्रामा झाला-चर्चा झाल्या-चर्वितचर्वण झालं फक्त त्याचा शेवट ‘दफा हो जाओ मेरे घरसे’ किंवा ‘तुम्हे मेरी लाश पर से गुजरना होगा’ असा झाला नाही..

त्यांनी ‘मधला’ मार्ग निवडण्याचं ठरवलं..

“त्याच्या पालनपोषणाचा खर्च पालक करतील पण त्याचा शैक्षणिक खर्च त्याचा त्यानंच सोडवावा भले तो कुठं नोकरी करो” असा अलिखित करार त्यांच्यात झाला..

तो तसाही परोपकारी गंपू होताच..त्याला आता फक्त माफक मोबदला आकारायचा होता..त्यानं अपंगांना मदत करायची ठरवलं..

तो ज्या महाविद्यालयात शिकत होता तिथंच एका स्टाफ मेंबरचा पाय अपघातात जायबंदी झाल्यानं काढून टाकण्यात आला होता..

यानं त्यांनाच मदत करायला सुरूवात केली..

चटकन पाणी आणून देणं-सांगेल ते काम ऐकणं यासोबतच हातात कुबड्या देणं-आधार देणं हे कामही तो करायचा..

बदल्यात त्याला पाॅकेटमनी मिळायचा..

पण हे ‘कुबड्या’ प्रकार अंमळ कंटाळवाणा आणि त्रासदायक होता..

मदत तर तो करतच होता पण पुढं जाऊन त्यानं काय करावं?

मित्रांसोबत वर्गणी गोळा करून त्यानं या अपंग व्यक्तीसाठी प्रोस्थेटिक पाय मागवला..

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणं सकाळी तो चहा देण्यासाठी स्टाफरूममध्ये गेला पण त्याच्या हातात चहाचा कप नव्हता..त्यानं समोरच्या टेबलवर एक खोकं ठेवलं..

अपंग व्यक्तीनं खोकं उघडलं..त्यातला पाय बघितला..

त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं जणू काही त्याला सर्वस्व मिळालं,सगळं जग मिळालं..

त्याचे ते हावभाव बघून याला अपंग असण्याचं दु:ख काय असू शकतं हे कळलं..

तो अश्या लोकांची मदत करत राहिला-शिक्षणापुरते पैसे कमवत राहिला अन् शिकतही राहिला..

त्याचं मिसूरीतलं पदवी शिक्षण पुर्ण झालं नंतर त्यानं पेनसिल्वानिया विद्यापीठातून वैद्यकिय शिक्षणही पुर्ण केलं..

काम करून शिकण्याचे त्याला ‘चार’ फायदे झाले एक घरच्यांना दिलेलं वचन पुर्ण झालं,दुसरं बालपणीचं डाॅक्टर व्हायचं स्वप्न पुर्ण करता आलं,तिसरं आपल्यामुळं कुणाचा तरी त्रास कमी होतोय याचा आनंद मिळाला आणि चौथं म्हणजे त्याची स्वप्नपरी त्याला याच प्रवासात भेटली..तिचं नाव ‘ग्लॅडिस’..त्यांनी लग्नही केलं..

वाॅशिंग्टन विद्यापीठातल्या सेंट लुईस वैद्यकिय महाविद्यालयात शिकवणं साईड बाय वैद्यकिय व्यवसाय असं मस्त आयुष्य चाललं होतं..मार्था,होवर्ड आणि जाॅन अशी तिन पिलंही झाली..

हे सगळं वाचल्यानंतर “अरे ही तर राजश्री प्राॅडक्शनच्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचतो की काय?एवढं सगळं गूडी गूडी?” असा विचार तुमच्या मनात येऊ शकतो पण रुको..सब्र करो..आहेत ट्विस्ट्स...

पहिल्या महायुद्घामुळं तो बालकामगार झाला होता यावेळी दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं होतं.

rusk institute of rehabilitation medicine doctor rusk 
inspirational story
आता अफगाणिस्तानात चालणार नाहीत 'परकीय नोटा'

आता तो अमेरिकन सैन्यासाठी जेफरसन बराकीत वैद्यकिय सेवेमध्ये रुजू झाला..

तिथं त्याला एक गोष्ट लक्ष्यात आली ती म्हणजे युद्धात ‘शहीद’ होणं परवडतं पण ‘जखमी’ होणं नाही..

छोट्या मोठ्या जखमांतून होणारा त्रास असो वा आलेलं कायमचं अपंगत्व असो हे सगळं उर्वरित आयुष्यासाठी प्रचंड तापदायक ठरतं..

“यांच्यासाठी काय करू शकतो आपण?” त्याला उठताबसता हा एकच प्रश्न भंडावून सोडू लागला..

त्यांची शारिरीक सेवा करणं-त्यांचं मनोबल वाढवून त्यांना मानसिक आधार देणं एवढं पुरे? झाली ड्यूटी?

काय बरं करता येईल अजून? तो सातत्याने यावर चिंतन करत बसे..

त्यानं छोटे मोठे प्लॅन्स तयार केले,अंपगत्वाला घेऊन दैनंदिन कामं करता यावी-स्वावलंबी रहावं-शक्यतो कुणाच्या आधाराची गरज भासू नये यासाठी सेशन्स आखले,मग त्याच्या लक्ष्यात आलं की अपंगत्व फक्त शारिरिकच असतं असं नाही मानसिक आघात त्याहूनही मोठा असतो यासाठी त्यानं समुपदेशन-चर्चासत्र-मेडिटेशन अश्या गोष्टींची आखणी केली..

काम संपलं??तर नाही..शरीर आणि मन निरोगी करणं सोपं,पण ते टिकवणं अवघड यासाठी मन-शरीर दोघं गुंतलेलं हवं मग त्यानं या लोकांसाठी अकाऊंटींग-पत्रकारिता-लाॅ-रेडिओ-परकीय भाषा-टंकलेखन यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले म्हणजे बरं होऊन गेल्यानंतर ‘नेमकं काय करावं?’ असा प्रश्न त्यांना उरणार नाही..

युद्ध संपलं त्याच्या या प्रयत्नांचा सैन्याला प्रचंड फायदा झाला..तो ही आपल्या घरी परतला पण इथं येऊन त्यानं अंगी भिणलेलं काम म्हणजे अपंगांची सेवा-त्यांचं पुनर्वसन हे सुरू ठेवलं..

त्याचे समव्यावसायीक मंडळी ‘हा आता पुरता सटकलाय’ या अविर्भावात कुत्सितपणं त्याच्याकडं बघू लागले..

काही हितचिंतकांनी ‘तु असा वेळ का वाया घालवतोयेस?’ अशी विचारणाही केली..

पण हे काम त्यातून उभी रहाणारी माणसं-त्यातून मिळणारं प्रचंड आत्मिक समाधान यामुळं तो आपलं काम करत राहिला..

दरम्यानच्या काळात न्युयाॅर्क टाईम्सच्या संपादकानं त्याच्याकडं संधीवातामुळं हलचाली अवघड झालेल्या पेशंटसाठी सदर लिहिण्याची विनंती केली..

औषंधाची मर्यादा-मनोबलाचं महत्व यातून आलेल्या अनुभवामुळं एव्हाना त्याचाही आत्मविश्वास वाढलेला होता त्यानं साप्ताहिक सदर सुरू केलं..

या सदरातून समुपदेशन-जनजागृती-आरोग्यशिक्षण या बरोबरच पुनर्वसन कार्यक्रमांचं महत्वही त्यांनी लोकांना पटवून दिलं..त्याचा एक वेगळा ‘वाचकवर्ग’ तयार झाला..

यातल्या बर्नार्ड बरूच,बर्नार्ड जिम्बलची पत्नी अल्वा अश्या उद्योजक मंडळींनी त्याला न्युयाॅर्क विद्यापीठात थेट पुनर्वसन केंद्र सुरू करून दिलं..

या केंद्रात पक्षाघात-अपंग-अपघाती-जळीत-जन्मजात दोष असणारे अश्या अनेक पेशंटवर संपुर्ण उपचार होऊ लागले..

इथं त्यानं पुनर्वसनासाठी खास वैद्यकिय प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली आणि जगभरातून अनेक डाॅक्टर्स इथं प्रशिक्षण घेण्यासाठी येऊ लागले..

तो अथक परिश्रम करत राहिला..त्यानं पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती वाढण्यासाठी ‘जागतिक पुनर्वसन फंड’ ही योजना सुरू केली..

जगभरातून त्याच्याकडं मदतीचा ओघ आला यातून कंबोडिया-अफगाणिस्तान-लेबनान अश्या एक ना अनेक ठिकाणी पुनर्वसन केंद्र उभी राहिली..

डाॅक्टर बनण्यासाठी लहानपणी कम्पाउंडरची नोकरी करणारा हा मुलगा पुढं जाऊन तब्बल नऊ अमेरीकन राष्ट्राध्यक्षांचा वैद्यकिय सल्लागार झाला..

त्याला ढिगानं मानसन्मान-पारितोषिकं मिळाले पण आपली ‘पुनर्वसन प्रकल्पाचा जनक’ हीच ओळख त्याला नेहमीच प्रिय राहिली..

त्यानं जगाला सगळ्यात महत्वाचं काय दिलं ते म्हणजे शारिरिक कमतरतेवर मात करण्याचं मनोधैर्य..

जीवनाचा निर्मळ आनंद घेण्याची वृत्ती..

विपरित परिस्थितीवर विजय मिळवण्याची जिद्द..

आणि प्रचंड सकारात्मक असा दृष्टिकोन..

त्यानं लाखो-करोडो लोकांच्या आयुष्याला कळत नकळत स्पर्श केला..

‘पुनर्वसनावर विश्वास म्हणजेच मानवतेवर विश्वास’ हे ध्येय ठेऊन तो आयुष्यभर जगला..

एका सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या मुलानं अपंगांना मदत करून मिळालेल्या पाॅकेटमनीतून ज्या विद्यापीठात पदवी घेतली तिथं त्याच्या नावाने आजही जगातलं पहिलं अन् सर्वात मोठं पुनर्वसन केंद्र दिमाखात उभं आहे..

इथं त्याच्या शिकवणीनुसार आजही फक्त अपंग शरीराची नाही तर मनाचीही काळजी घेतली जाते..

हे केंद्र म्हणजे ‘रस्क इन्स्टीट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन मेडिसिन’

अन् आपल्या कनवाळुपणाला आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता वैद्यकिय क्षेत्रात थेट ‘रिहॅबिलिटेशन मेडिसिन’ ही स्वतंत्र शाखाच विकसित करणारा सकारात्मक विचारांचा तो आनंदयात्री म्हणजे डाॅ.हाॅवर्ड ए. रस्क..

आज रस्क यांचा स्मृतीदिन..विनम्र अभिवादन

-डॉ.प्रज्ञावंत देवळेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com