दुर्घटनाग्रस्त इंडोनेशियन विमानाचे सापडले अवशेष; प्रवाशांचा शोध सुरु

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले होते.

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले होते. आणि आता या विमानाचे काही अवशेष सापडले आहेत.  माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, श्रीविजया एअर कंपनीच्या SJ 182 या विमानात 12 कर्मचाऱ्यांसह 62 प्रवासी होते. या विमानाचा शोध सुरु करण्यात आला होता. आतापर्यंत विमानाचे लोकेशन समजू शकलेले नव्हते. फ्लाइट रडार 24 नुसार हे विमान बोइंग 737-500 मालिकेतील आहे. शनिवारी दुपारी जकार्ता येथील सुकिर्णो हत्ता विमानतळावरुन उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर चार मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटला होता. दरम्यान, रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जकार्ता शहरातील समुद्रात संशयास्पद अवशेष आढळून आले होते. 

अद्याप या विमान दुर्घटनेचं कोणतंही कारण समोर आलं नाहीये. या दुर्घटनेत लोक वाचलेत का याचं शोध घेण्याचे काम सध्या सुरु आहे. याबाबत माहिती देताना जकार्ता पोलिसांचे प्रवक्ते युसरी युनूस यांनी सांगितलं की, आज सकाळपर्यंत आम्हाला बॉडी पार्ट्सचे दोन अवशेष सापडले आहेत. यामध्ये प्रवासाच्या सामानाचा काही भाग देखील आहे. या विमानातून 62 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये 10 लहान मुलांचाही समावेश होता. हे सगळे इंडोनेशियाचे नागरिक आहेत. 

हेही वाचा - मध्यरात्री अख्ख्या पाकिस्तानातील बत्ती गुल; #blackout ट्विटरवर ट्रेंड

याआधी इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी करया सुमादी यांनी म्हटलं होतं की, एसजे 182 या विमानाने एका तास उशीरा स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:36 वाजता उड्डान केलं होतं. ज्यानंतर केवळ चार मिनिटांच्या आतच रडारपासून विमानाचा संपर्क तुटला. पायलटने 29,000 फुटाच्या उंचीवर जाण्यासाठी संपर्क केला होता. एअरलाईनकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने जकार्तामधून पोंटियानकसाठी उड्डान केलं होतं. ही इंडोनेशियाच्या बोर्नियो द्वीपमधील पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी आहे. या उड्डानाचा अवधी जवळपास 90 मिनिटांचा होता. विमानामध्ये 50 प्रवाशांसह विमानसेवेचे 12 सदस्य होते. 

जकार्ताहून बेपत्ता झालेले विमान बोइंग 737 मॅक्स मालिकेतील आहे. या विमानाच्या सुरक्षेवर यापूर्वी अनेकवेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. बोइंग या विमानाचे उत्पादन बंद करण्याचा विचार करत असल्याचेही बोलले जात आहे. या विमानाची सर्वात मोठी समस्या ही याच्या इंजिनमध्ये आहे. इंधनाची बचत होत असली तरी इंजिनमध्ये समस्या असल्यामुळे याचा वेग कमी होऊ शकतो आणि विमान बंद पडू शकते. या समस्येशी सामना करण्यासाठी कंपनीने एक एमसीएएस नावाचे सॉफ्टवेअर विमानात लावले आहे. परंतु, अनेकवेळा याचे सॉफ्टवेअरही चुकीची माहिती देते. त्यामुळे विमान अपघातग्रस्त होण्याची शक्यता वाढते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigators says Body Parts Found At Indonesian Plane Crash Site